ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत बाहेरुन येऊन काम करणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील ताडदेव येथे 1000 नोकरदार महिलांची राहण्याची व्यवस्था होईल असं सुसज्ज वसतिगृह उभारण्यात येत आहे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी दिली.
याबाबत माहिती देताना आव्हाड म्हणाले, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार हे वसितगृह उभारण्यात येत आहे.
- म्हाडा घेणार जबाबदारी
पुढे ते म्हणाले, हे वसतिगृह म्हाडाच्या वतीने सुरू करण्यात येत आहे. केवळ नोकरदार महिलांसाठी हे वसतिगृह असणार असून येत्या दीड ते दोन वर्षात हे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. या वसतिगृहात 500 खोल्या असणार आहेत. या वसतिगृहासाठी 35 कोटी खर्च येणार असून सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असे हे हॉस्टेल असणार आहे, असेही आव्हाड यांनी यावेळी सांगितले.