प्रोग्रेसिव्ह प्रंट ऑफ गोवाचा इशारा
प्रतिनिधी/ पणजी
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर गोमंतभूमीचे अस्तित्व संपविण्यासाठी गोव्यात आले आहेत. म्हादई व मोले या प्रकरणासाठी फक्त जावडेकर जबाबदार आहेत. कृषी विधेयकाचा संबंध नसताना गोव्यात आले ते फक्त म्हादईची दलाली करण्यासाठी आले आहेत. परंतु गोमंतकीय म्हादईची दलाली करायला देणार नाही, असा इशारा प्रोगेसिव्ह प्रंट ऑफ गोवाने पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला. यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत, जीना परेरा, ऍड. हृदयनाथ शिरोडकर उपस्थित होते.
म्हादईप्रश्नी प्रकाश जावडेकर यांनी खोटेपणा दाखविला आहे. अशा माणसाचा धिक्कार आहे. भाजप सरकार गोवा संपविण्यासाठी उठले आहेत. म्हादई आणि मोलेप्रकरणी जावडेकर जबाबदार आहेत. गोव्याचे अस्तित्त्व संपतेय ते पाहून साजरा करण्यासाठी गोव्यात आले आहेत. कुणीतरी म्हटलेय की जावडेकर गोव्यात सुट्टीसाठी आले नाहीत. मंत्री जावडेकर सुट्टीसाठी नाही तर साजरीकरणासाठी आले आहेत. कृषी विधेयक काय आहे हे सांगण्यासाठी आले असले तरी म्हादई, दुधसागरचे पाणी वळविले तर गोव्यात शेती करण्यासाठी पाणी कुठून आणणार याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणी प्रोग्रेसिव्ह प्रंट ऑफ गोवाचे महेश म्हांबरे यांनी यावेळी केली.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा कृषी विधेयकाला संबंध नसताना गोव्यात शेतकऱयांशी संवाद साधण्यासाठी आले ते फक्त म्हादईची दलाली करण्यासाठी. गोव्याचे मुख्यमंत्री, मंत्री प्रल्हाद जोशी आणि मंत्री जावडेकर हे या दलालीत सामील असून या दलालीचा मुख्य सूत्रधार मंत्री जावडेकर आहेत. म्हादईची दलाली करायला देणार नाही असा इशारा गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी दिला.
राजकारणाचा अजेंडा घेऊन कार्य करत असल्याचे काही घटक आरोप करत आहे. जर आम्ही राजकीय अजेंडा घेऊन विषय हाताळतोय तर तुम्ही कुठला अजेंडा घेऊन काम करतायेत याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. परंतु त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे जुने फोटो प्रसिद्ध करण्यात आले. खाणप्रश्न घेऊन म्हादई विकायला मुख्यमंत्री देल्लीला गेले होते का ? म्हादईबद्दलचे षडयंत्र पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा ऍड. हृदयनाथ शिरोडकर यांनी दिला.