मगो नेते सुदिन ढवळीकर यांचे आवाहन
वार्ताहर /मडकई
गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादईच्या प्रश्नावर भाजपा सरकार गोमंतकीय जनतेला न्याय देऊ शकले नाही. मगो पक्षाने हा प्रश्न वारंवार उपस्थित करुनही सरकार त्यावर कुठलीच ठाम भूमिका घेऊ शकले नाही. म्हादईच्या मुद्दय़ावर भाजपाला जाब विचारा, असे आवाहन मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला आहे.
या विषयावर बोलताना सुदिन ढवळीकर म्हणाले, म. गो. पक्षाने म्हादई बचाव आंदोलनात विविध संघटना, संस्था व जनतेला साद दिली. त्याला उंदड प्रतिसाद देत म्हादईचा संगम असलेल्या कळसा भंडुरा येथे मगो पक्षाने धरणे धरले. या एका दिवसाच्या धरणे कार्यक्रमानंतर ज्या ज्या मतदार संघातून म्हादई वाहते त्या त्या ठिकाणी जनजागृती करण्यात आली. कळसा भंडुरा येथून म्हादईचे आणलेले प्रवीत्र जल खांडेपारच्या नदीत विसर्जीत करण्यात आले. म्हादईचा हा लढा गोव्याच्या अस्थित्त्वाचा लढ आहे. मगो-तृणमूल युतीला संधी देऊन गोमंतकीय मतदार म्हादई बचावचा आवाज बुलंद करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजीवन साखर कारखान्याचा प्रश्न असो किंवा जुने प्रकल्प अर्धवट ठेऊन नवीन राजभवन उभारण्याचे भाजपा सरकारचे मनसुबे असोत, मगो पक्षाने विधानसभेत त्यावर आवाज उठविला आहे. मतांसाठी दारात येणाऱया भाजपा उमेदवारांना त्याचा जाब विचारा, असे आवाहन ढवळीकर यांनी केले आहे. मडकई मतदार संघातून आपण पाच निवडणुका सलग निवडून आलो. मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला अनेकवेळा आमिषे दाखविण्यात आली. मात्र मगो पक्ष भाजपात विलीन करुन गोमंतकीय जनतेचा विश्वासघात केला नाही, असेही ते म्हणाले.
मगो पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानेच मडकईतील मतदारांनी विक्रमी मतांनी निवडून दिले. मागील एक दोन निवडणुकांमध्ये आपण स्वतः प्रचारात सहभागी न होता आपले कार्यकर्ते, मतदार व ज्येष्ठ बंधू स्व. मोहन ढवळीकर, दिलीप ढवळीकर, पत्नी ज्योती ढवळीकर यांनीच प्रचाराची धुरा सांभाळली. केवळ जनतेच्या प्रेमामुळेच हे शक्य झाले. मगो-तृणमूल युतीला जास्तीत जास्त जागा मिळवून देण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.