प्रतिनिधी/ पणजी
म्हादई वाचविण्यासाठी अनेकांची आंदोलने झाली असून आता दीर्घकाळानंतर मगो पक्ष आंदोलन छेडणार आहे. सत्तरीतील साटे येथून हे आंदोलन सुरु होणार आहे. आंदोलनाचा कार्यक्रम निश्चित करण्यासाठी 11 जानेवारी रोजी मगोच्या कार्यकारी मंडळाची बैठक घेण्यात येणार असल्याचे मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्याची आर्थिक स्थिती खालावलेली असल्याने सरकारने उधळपट्टी थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सनबर्नसारख्या पाटर्य़ा बंद व्हायला हव्यात. सरकारने यावर बंदी घालायला हवी. लूट करण्यासाठी सरकारला या पाटर्य़ा हव्या, असा आरोपही ढवळीकर यांनी केला. या पाटर्य़ामुळे अंमली पदार्थांचा सुळसुळाट राज्यात वाढला आहे. पर्यटनमंत्री बाबू आजगावकर हे विदेश वाऱया करुन पैशांची उधळपट्टी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर सरकार कायद्याचे उल्लंघन करुन स्वायत्त सहकारी संस्थांमध्ये हस्तक्षेप करीत आहे. ते योग्य नव्हे असेही ते म्हणाले.
सरकारची आर्थिक स्थिती अंत्यत वाईट आहे. सरकारने या आर्थिक वर्षात 2000 कोटींचे कर्ज घेतले आहे. पुढील तीन महिन्यात सरकार कर्ज काढू शकणार किंवा नाही यावरही त्यांनी टिप्पणी केली. वाहन खरेदी करण्यासाठी रस्ता करात 50 टक्के एवढी सुट सरकारने दिली. सूट देऊन तीन महिन्यात 54 कोटी सरकारला मिळाले. मात्र 100 टक्के कर असताना पूर्वीच्या तीन महिन्यात 48 कोटी मिळाले होते. त्यामुळे रस्ता करात कपात करुन सरकारला फार मोठा फायदा झाला नाही. सरकारने खर्चात कपात करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.