आज पूजन करण्याचे ‘सेव्ह म्हादई सेव्ह गोवा’ फ्रंटतर्फे आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
म्हादई बचाव आंदोलनाची तीव्रता वाढत असून राज्यातील विविध भागांतून त्याला पाठिंबा मिळत आहे. टप्प्याटप्प्याने आंदोलनाची दिशा ठरवली जात आहे, अशी माहिती प्रा. प्रजल साखरदांडे यांनी दिली. आज रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता सर्वधर्मीय लोकांनी आपापल्यापरीने म्हादईचे पूजन करून एक वात म्हादईसाठी म्हणून दिवा, मेणबत्ती किंवा समई पेटवून आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सूचित करावे, असे आवाहनही प्रा. साखरदांडे यांनी केले आहे. तसेच त्याचा फोटो विविध ग्रुपमध्ये व्हायरल करावा, असे असेही ते म्हणाले.
‘सेव्ह म्हादई सेव्ह गोवा’ फ्रंटच्यावतीने शनिवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रा. साखरदांडे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पॅड्रिशिया पिंटो, अॅड. हृदयनाथ शिरोडकर, महेश म्हांबरे, अभिजित प्रभुदेसाई, मारयान फेर्रांव, ऍना ग्रासियस, डायना तावारीस, गणेश गावकर तसेच राज्यातील बिगर सरकारी संस्थांचे पदाधिकारी उस्थित होते.
म्हादईचा विषय गावागावात पोहचविण्यासाठी तालुका तसेच मतदारसंघस्तरीय समित्यांची निवड करण्यात आली असून सोमवारपासून प्रत्येक गावागावात पंचायत स्तरावर कोपरा बैठका होतील. तालुकास्तरावर सभा होतील. दि.16 फेब्रुवारी रोजी पाटो पुलावर संध्याकाळी 7.30 वा. म्हादईचे पूजन करून म्हादई आरती करण्यात येणार आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रा. साखरदांडे यंनी केले.