प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा पालिकेचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व अभियंता विभागाला भाजपच्या नगरसेवकाने अंधारात ठेवून स्वतःच्या मर्जीनुसार काही पालिकेच्या कर्मचाऱयांना हाताशी धरून खोर्ली सीम येथील मगो नेते भारत तोरस्कर यांच्या दुकानाबाहेरील प्लास्टिक छत्र काढण्यासाठी आले असताना कर्मचाऱयांना नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
म्हापसा पालिकेच्या निवडणुकीत माजी उपनगराध्यक्ष विनोद फडके यांचा पुत्र विराज फडके व भारत तोरस्कर यांचा पुत्र शुभम तोरस्कर यांनी एकमेकाच्या विरोधात प्रभाग 16 मधून निवडणूक लढवली होती. त्यावेळीपासून भारत तोरस्कर यांना सतावणूक करण्याचा विडा फडके पिता-पुत्राने उचलला होता. निवडून आल्यानंतर भारत तोरस्कर यांचे म्हापसा बाजारपेठेतील दुकान बंद पाडण्यासाठी पालिका कर्मचाऱयांचा वापर सुरू होता. आज सकाळी पालिकेला अंधारात ठेवून फडके पिता-पुत्राने भारत तोरस्कर यांच्या खोर्ली सीम येथील दुकानासमोर अतिक्रमण काढण्यासाठी पालिका कर्मचाऱयांसह स्वतः उपस्थित राहिले.
पालिका कर्मचाऱयांजवळ अतिक्रमण हटविण्याचे पालिका मुख्याधिकाऱयांचे आदेशपत्र नव्हते. त्यामुळे भारत तोरस्कर यांचे पुत्र शुभम तोरस्कर यांनी हरकत घेतली व पालिका रिक्षाची चावी काढल्यामुळे नगरसेवक विराज फडके यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. मुळात अतिक्रमण हटाव करण्यासाठी नगरसेवकांना पालिका कायद्यानुसार अधिकार नाही. खोर्ली सीम भाग हा प्रभाग 18 मध्ये येतो. या भागाची नगरसेविका अवनी कोरगावकर यांनी अशा तक्रारीची तक्रार पालिकेत दिली नाही. तरीही प्रभाग 16 चा नगरसेवक प्रभाग 18 मधील अतिक्रमण हटाव करण्यासाठी आल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
माजी नगरसेवक तुषार टोपले यांनी पालिका कर्मचाऱयांना अतिक्रमण हटावाचा मुख्याधिकाऱयांचा आदेश दाखविण्याची मागणी केली असता माजी उपनगराध्यक्ष विनोद फडके यांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. पण टोपले यांनी शांत राहून कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे असे सूचित केले. तसेच माजी नगराध्यक्ष आर्मिन ब्रागांझा यांनी सुद्धा टोपलेची रि ऑर्डर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. नगरसेवक कायदा हातात घेऊ शकत नाही असे सांगितले. नगरसेवक विराज फडके व शुभम तोरस्कर यांनी पोलीस तक्रारी केल्या आहेत. पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू झाली आहे.