प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसा बाजारपेठेत दोन दिवसापूर्वी झालेल्या चोरीचे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारी पहाटे अज्ञान चोरटय़ांनी म्हापसा बाजारपेठेतील मोबाईल दुकानाचे शटर तोडून आतमधील रोख रुपये एक लाख पंचवीस हजार, लॅपटॉप, पावर बँक आदी सामान मिळून एक लाख नव्वद हजाराचा माल लंपास केला.
म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही चोरी मध्यरात्री झाल्याचे उघडकीस आले आहे. अज्ञान चोरटय़ांनी शटरची पुढील कुलपे तोडून व शटर वाकवून आतमध्ये प्रवेश केला. बाजारपेठेत असलेल्या नरपथसिंग राजपूत यांच्या विवो मोबाईल शॉपमध्ये प्रवेश करून गल्ल्यात ठेवण्यात आलेले एक लाख पंचवीस हजार, 27 पावर बँक, मोबाईल चीप्स, आदी सामान मिळून एकूण एक लाख 90 हजाराची चोरी केली. म्हापशात झालेल्या या चोरीमुळे दुकान मालकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसापूर्वीच म्हापसा बाजारपेठेत असलेल्या एक औषधालय तसेच काजू गर व भुसारी दुकानात छप्पर कापून आतमध्ये प्रवेश केला होता. व अन्य दोन दुकानांची शटर तोडून चोरी केली होती. आजच्या चोरीमध्ये व दोन दिवसापूर्वी झालेल्या चोरीमध्ये पोलिसांना साम्य आढळून आले आहे. त्यामुळे ही चोरी करणारे चोरटे एकच असावे असा पोलिसांचा कयास आहे.
म्हापसा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सुनील पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास चालू आहे.