प्रतिनिधी/ म्हापसा
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे म्हापसा येथे उत्तर गोवा भाजपा कार्यालयात आगमन होताना म्हापशातील शेतकरीबांधवांनी श्री बोडगेश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे यांच्या नेतृत्वाखाली येथील हुतात्मा चौकात राहून काळे बावटे दाखवून निषेध व्यक्त केला.
आम्हा शेतकऱयांची नावे ओडीपीमधून वगळली आहे ती पुन्हा घालावी अशी मागणी जॉन लोबो यांनी केली आहे. आमचे पर्यावरण हरित ठेवा, असे ते म्हणाले. आज आम्ही बावटे दाखवून न्याय देण्याची मागणी करणार. आम्ही आमची जमीन मुळीच देणार नाही. सरकारने शेतकऱयांबाबत प्रथम निर्णय घ्यावा. सरकारची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही, असे अनिल केरकर म्हणाले.
संजय बर्डे म्हणाले की, आम्ही म्हापसा शेतकरीबांधव शेतीसाठी भांडत आहोत. सरकारने मोपावासियांना फसविले. आज म्हापसावासियांना फसवायला आले आहेत. आज आमची नावे गहाळ करण्याचे ठरविले आहे. आज सरकार 300 कोटीचे कर्ज का काढत आहे. हे पैसे नाही तर आमचे शेतकरीबंधूंचे काय होणार, राज्यसभेत बिल पास केले आहे. कंत्राट फार्मिंग व नावे गहाळ केली या कृतीची माहिती देऊन निषेध करण्यासाठी आम्ही येथे जमलो असल्याचे श्री. बर्डे यांनी सांगितले. पर्यावरण मंत्री येथे आले असता शेतकरीवर्गाने जावडेकर विरोधात घोषणा दिल्या.