प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसा पालिका मंडळावर सरळपणे भाजप समर्थक नगरसेवकांची सत्ता येण्याचा मार्ग आज मोकळा झाला. नवनिर्वाचित नगरसेवक तारक आरोलकर, विकास आरोलकर आणि विराज विनोद फडके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, याआधी शुभांगी वायंगणकर या नगरसेविकेने भाजपमध्ये फेरप्रवेश केला होता.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी त्यांना भाजपमध्ये भाजपची शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रवेश दिला. भाजपच्या यएथील कार्यालयात मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले 26 रोजी म्हापसा पालिकेचा नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये काल प्रवेश केला आहे. म्हापसा शहराच्या विकासासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विकासात यापुढे त्यांचा सक्रिय सहभाग असेल. बार्देशमध्ये भाजप संघटना बळकट करण्यासाठी त्यांचा वाटा असेल. विधानसभेच्या येत्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ते नेटाने वावरणार आहेत.
तानावडे म्हणाले की, आज तीन नगरसेवक भाजपमध्ये आले. नगरसेवक प्रकाश भिवशेट हे आज येथे पोचले नसले तरी तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचे प्रभाग हळदोणे मतदारसंघात येतात. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाचा येत्या निवडणुकीत पक्षाला फायदा होणार आहे. एक चांगल्या पक्षात त्यांनी प्रवेश केल्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी पालिकेची निवडणूक वेगळय़ा पॅनलमधून लढविली होती तर त्यांचा विजय हा वैयक्तिक होता. विकास करण्यासाठी भाजपसोबत यावे असे त्यांना वाटले त्यामुळे ते भाजपमध्ये दाखल झाले आहे. भाजपच्या म्हापसा मंडळ समितीचे अध्यक्ष रुपेश कामत, हळदोणचे आमदार ग्लेन टिकलो यावेळी उपस्थित होते.