आरोग्य मंत्र्यांनी लक्ष देण्याची कर्मचारी, रुग्णांची मागणी : अवघ्या काही कर्मचाऱयांच्या दबावाखाली नोटीस काढण्याची चर्चा
प्रतिनिधी /म्हापसा
येत्या 30 जून रोजी म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळाचे अधीक्षक डॉ. मोहनदास पेडणेकर दीर्घकालीन सेवा निवृत्त होत आहेत त्याचा फायदा घेत येथील काही कर्मचारी वर्गांच्या दबावाला बळी पडून अधीक्षकांनी आझिलोतील औषधालयाच्या वेळेत बदल केल्याने आता याचा त्रास मात्र सामान्य जनतेला होणार आहे. आरोग्य मंत्र्यांना अंधारात ठेवून येथील औषधालयातील कर्मचारी वर्गांनी आपल्या कामाच्या वेळेत अधीक्षकांवर दबाव आणून हे कृत्य केल्याची माहिती आझिलोतील सूत्रांनी दिली. जनतेच्या सोयीसाठी सरकार सर्वकाही करू पाहत आहे मात्र याच सरकारी इस्पितळातील कर्मचारी वर्ग आम्ही करेल तो कायदा असे सरकारला दाखवून द्यायला पाहत आहे. यामुळे आरोग्य मंत्र्यांचे येथे काहीच वर्चस्व नाही हे स्पष्ट होते. येथील औषधालयाची वेळ पूर्ववत करावी अशी मागणी येथील नागरिक व आझिलोतील काही कर्मचारी वर्गांनी केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उत्तर गोवा जिल्हा इस्पितळातील औषधालय सकाळी 8 ते सायं. 8 असे बारा तास सुरू आहे. सकाळी 8 ते दु. 2 व दु. 2 ते रात्री 8 अशा दोन शीफ्टमध्ये कर्मचारी वर्ग या औषधालयात सेवा बजावित आहे. जेणेकरून आपत्कालीन (पॅज्युलटी) विभागात येणाऱया रुग्णांना या औषधालयाचा मोठा फायदा होतो. जेणेकरून त्यांच्या नातेवाईकांना औषधे आणण्यासाठी इतरत्र धावपळ करावी लागत नाही. दरम्यान येत्या महिन्यापासून हे औषधालय फक्त दिवसावेळी म्हणजे सकाळी 9 ते दु. 4.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तसा निर्णय येथील फार्मसीमधील अधिकारी वर्गांनी घेतला आहे. हा निर्णय घेताना सामान्य जनतेचा विचार न करता त्यांनी फक्त आपलाच विचार केला आहे. यामुळे आता याचा त्रास रात्रीच्यावेळी येणाऱया नागरिकांना होणार आहे. आरोग्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून या औषधालयाची वेळ रात्रीपर्यंत खुली असणार अशी करावी. लोकहितार्थ ही वेळ 8 ते 2 व 2 ते 8 पर्यंत करावी अशी मागणी होत आहे.
औषधालय आता 4.30 पर्यंत खुल्या केल्या आहेत
दरम्यान याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळाचे अधीक्षक मोहनदास पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले सध्या औषधालयात पुरेसा औषधांचा साठा आहे. तो पॅज्युल्टी व मॅडिसीन विभागात देण्यात येतो. सरकारी फार्मसी त्यात जीएमसी सुद्धा रात्रीच्यावेळी खुल्या नसतात. जिल्हा आझिलोची वेळ खरी 4 पर्यंत आहे मात्र ती वाढवून 8 करण्यात आली होती. पण आता ती 4.30 वाजेपर्यंत करण्यात आल्याचे श्री. पेडणेकर म्हणाले.