उपनगराध्यक्षपदासाठी शेखर बेनकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब
प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसा नगरपालिकेत निवडून आलेले म्हापसेकारांचो एकवटचे तारक आरोलकर यांचे बंधू विकास आरोलकर व विराज फडते यांनी रितसर भाजपात प्रवेश केल्याने आता म्हापशात राजकीय समीकरणात बदल झाला आहे. यापूर्वी भाजपात स्वगृही परतलेल्या शुभांगी वायंगणकर व सलग दुसऱयांदा निवडून आलेले शेखर बेनकर यांचे अनुक्रमे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपद निश्चित झाले आहे. भाजपप्रणित म्हापसा विकास आघाडीचे 9 व अन्य तिघांनी व शुभांगी वायंगणकर यांनी पणजी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या सहकार्याने रितसर प्रवेश करून म्हापशात आता भाजपचाच झेंडा फडकणार हे निश्चित झाले आहे.
शुभांगी वायंगकर तारक आरोलकर, व विराज फडते हे म्हापसेकरांचो एकवट या पॅनेलमधून निवडून आले होते. त्यांनी अखेर ऐनवेळी सुधीर कांदोळकर यांची साथ सोडून भाजपात प्रवेश केल्याने म्हापसेकरांचो एकवटसाठी हा एक मोठा हादरा बसला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच म्हापशांचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी आमच्याकडे नगराध्यक्षपदासाठी तीन महिला आहेत, असे स्पष्ट केले होते. नगराध्यक्षपदाची माळ अनुभवी नगरसेवकांच्या गळय़ात पडेल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार स्वगृही परतलेल्या शुभांगी वायंगणकर यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी निश्चित केल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दुसऱया बाजूने स्व. ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांचे निकटवर्तीय तथा जोशुआ डिसोझा यांचे खंदे समर्थक सलग दुसऱया वेळी निवडून आलेले शेखर बेनकर यांचे नाव उपनगराध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळयात पडेल याबाबत म्हापशात उलट सुलट चर्चा सुरू होती. मध्यंतरी मावळते नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांची बहीण केल ब्रागांझा यांच्या गळय़ात ही माळ पडेल अशी चर्चा होती. त्यादृष्टीने रायन ब्रागांझा यांनी आपले प्रयत्नही सुरू केले होते. मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी बाळू पडते यांनी आपले चिरंजीव विराज फडते यांच्यासाठी प्रयत्न चालवीले होते. मात्र त्यांनाही आपला डाव साधता आला नाही.