उत्कृष्ट सेवा बजावल्याने अधिकाऱयांकडून कौतुकाची थाप
प्रतिनिधी / म्हापसा
कामगार दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट सेवा बजावणाऱया सात अधिकारी व कर्मचाऱयांचा म्हापसा पालिकेतर्फे गोरव करण्यात आला. पालिकेने यंदापासून मुख्याधिकारी पुरस्काराचा प्रारंभ केला आहे. शुक्रवारी पालिका कार्यालयात नगराध्यक्ष रायन ब्रागांझा व मुख्याधिकारी क्लेन मदेरा यांच्याहस्ते मार्केट निरीक्षक नरसिंह राटवळ काकणकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच अधिकारी व कर्मचारी वर्गाला गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी नगरसेवक मार्टीन कारास्को उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त कर्मचाऱयांमध्ये पालिका कनिष्ठ अभियंता नदीन शेख, संगीता आर्लेकर, मार्केट निरीक्षक नरसिंह राटवळ, पर्यावेक्षक सुनील नाईक, कनिष्ठ कारकून सर्वेश गडेकर, चालक प्रकाश तलवार व कर्मचारी संगीता देसाई यांचा समावेश आहे. वर्षभराच्या कामगिरीवर या कर्मचाऱयांना पुरस्कार देण्यात आला. या कर्मचाऱयांनी कुठलीही तक्रार न करता प्रामाणिक व समर्पित भावनेने आपापल्या विभागात काम केले आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन पालिकेने त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती दिली असल्याचे सांगून मुख्याधिकारी क्लेन मदेरा यांनी या कर्मचाऱयांचे तोंडभरून कौतुक केले. हा पुरस्कार म्हापसा पालिकेतर्फे पहिल्यांदाच दिला जात आहे. समाजिक अंतराचे पालन करून हा कार्यक्रम आयोजित केला गेला. पालिकेत अशा प्रकारे एकनिष्ठ सेवा बजावणारे अनेक कर्मचारी आहेत. त्यांचा देखील आगाममी काळात गौरव करण्यासाठी पालिका मंडळाने हा पुरस्कार सुरूच ठेवावा असे आवाहन मुख्याधिकारी मदेरा यांनी केले. स्वतःच्या कामातून या कर्मचारीवर्गाने आपले कर्तृत्व कमावले आहे. त्यामुळे हे कर्मचारी पुरस्कारास पात्र ठरले आहेत. यापुढे हा पुरस्कार सुरूच जाईल. इतरांनी या कर्मचाऱयांचा आर्दश घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी केले.