वार्ताहर / म्हापसा
म्हापसा कदंब बसस्थानकाची पायाभरणी करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी म्हापसा वासियांची फसवणूक केली आहे. हा 3 कोटीचा बसस्थानक म्हणजे पालिका निवडणुका जवळ आल्याने दाखविलेले अमिष आहे असे काँग्रेसचे प्रवक्ते विजय भिके यांनी संगितले. उत्तर गोवा काँग्रेस कमिटीतर्फे काल मुख्यमंत्र्यांनी पायाभरणी केलेल्या म्हापसा बसस्थानकाच्या फलकाकडे काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. यावेळी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
याअगोदर म्हापशाचे माजी आमदार उपमुख्यमंत्री ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांनीही असेच बसस्थानकाच्या पायाभरणीचे फलक लावले होते तरी या ठिकाणी बसस्थानक झाला नाही. आता निवडणुका जवळ आल्याने सरकार अशी खोटी आमिषे दाखवित आहे. या पैशाचा फक्त चुराडा केला जाणार असून लोकांचे पैसे मातीत जाणार असल्याचे विजय भिके म्हणाले. या ठिकाणी पावसाळय़ात पाणी साचते. तसेच सर्वत्र दुर्गंधी पसरते. फक्त निवडणुका आल्यावर या सरकारला ही कामे करण्याची आठवण येते. म्हापसाची बार्देशची जनता असून लोक या भाजप सरकारच्या भुलथापांना बळी पडणार नाही असे विजय भिके म्हणाले.