गावठी आमटाण, कैऱया, सुके मासे, कोकम, तेल, भाज्याची मोठय़ा प्रमाणात विक्री : पुरमेंतची खरेदी,कोविड काळानंतर प्रथमच बाजार फुलल्याने व्यापारी वर्ग आनंदीत
गिरीश मांद्रेकर /म्हापसा
उत्तर गोव्यातील आणि गोव्यातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणजे ‘म्हापसा बाजारपेठ’. शुक्रवार दि. 8 एप्रिल रोजी शुक्रवारच्या बाजारात ग्राहकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केलेली पहायला मिळाली. म्हापसा पालिकेने यापूर्वी कोविडच्या भीतीपोटी बाजारपेठ भरण्यास काही अटी घातल्या होत्या. मात्र त्या अटी उठविल्याने कोविड काळानंतर प्रथमच म्हापसा बाजार ग्राहकांनी खरेदीसाठी गजबजून गेला. विशेष म्हणजे पारंपरिक वार्षिक मिरची वगळता ग्राहकांनी गावठी सर्व वस्तू खरेदी केल्या.
उत्तर गोव्यातील ही म्हापशाची बाजारपेठ सर्वत्र राज्यभर प्रसिद्ध आहे. केवळ बार्देशातीलच नव्हे तर राज्याबरोबरच सिंधुदुर्ग मधीलही महिला वर्ग या प्रसिद्ध बाजारपेठेत गावठी वेगवेगळय़ा वस्तू विक्रीस आणतात. स्थानिक नागरिक, परराज्यातील नागरिक, म्हापसा व्यापारी संघटना आदी दुकानदार मिळून दर शुक्रवारी या बाजारपेठेत सुमारे 10 कोटीची उलाढाल होते. म्हापसा बाजारपेठेत पाय ठेवला की अशी कोणतीच वस्तू वा सामान नाही जे मिळू शकत नाही.
शुक्रवारी 8 एप्रिल रोजी म्हापशात खास बाजार भरला होता. उत्तर गोव्याची आर्थिक राजधानी म्हणजे म्हापसा बाजारपेठ. अगदी गोवा, सिंधुदूर्ग, बेळगाव, कोल्हापूरसह मोठय़ा प्रमाणात माल म्हापशात दाखल होतो. गोवेकर शेतकरी, बागायतदार आणि इतर शेतकऱयांचा मालही येथे विक्रीस येतो. पेरूमेंताची तयारी सुरू होणार आहे. मिरच्या, पेरू, चिंच, उकडे तांदूळ, आंबा, साठे, फणस आदींची अवकही सुरू झालेली आहे.
कैऱया मोठय़ा प्रमाणात विक्रीस
या प्रतिनिधीने बाजारपेठेची माहिती जाणून घेण्यासाठी शुक्रवारी म्हापसा बाजारपेठेत फेरफटका मारला असता सर्व प्रकारच्या सामानांनी बाजारपेठ गजबजून गेला. अद्याप तसा पुरुमेंत सुरू झाला नसला तरी म्हापसा बाजारपेठेत आज दरवर्षीप्रमाणे तोरे (कैऱया) मोठय़ा प्रमाणात विक्रीस आल्या होत्या. वाळपई, सोनुल्ली, सांखळी, कवठणी, सातार्डे येथील कैऱया घेऊन महिला वर्ग म्हापसा बाजारात आल्या होत्या. एकदम छोटय़ा कैऱया 200 रुपये शंभर, मध्यम अडीचशे ते तीनशे व मोठय़ा कैऱया 400 ते 500 रुपये दराने विक्रीस उपलब्ध होत्या.
गोव्याबरोबर संधुदुर्गमधून करवंदेही बाजारपेठेत विक्रीस आली होती. 60 ते 70 रुपये पट या दराने ती विकली गेली. असे असले तरी आज नागरिकांनी कैऱया खरेदी करण्यास मात्र एकच गर्दी केलेली पहायला मिळाली. म्हापसा मटकी बाजाराच्या पाठीमागे या कैऱया मोठय़ा प्रमाणात विकल्या गेल्या. कैऱयाची मोठय़ा प्रमाणात विक्री झाल्याची माहिती वाळपई येथील गुलाबी सावंत या महिलेने दिली. म्हापसा बाजारपेठेत कैऱयांना चांगला भाव मिळतो शिवाय आमच्या कैऱया विक्रीस ठेवल्या की लोक मोठय़ा प्रमाणात त्याची खरेदी करतात अशी माहिती त्यांनी दिली. इतक्या लांबून येणे आम्हाला परवडत नाही मात्र कैऱयांचे भावही तसे वाढल्याने परवडत असल्याचे त्यांनी सांगितले.
गावठी भाज्या उपलब्ध
स्थानिक महिलाही गावठी सोले (कोकम), मयडे येथील भाज्या त्यात कणगी (रताळी), काटेकणगी, गावठी सोले, तिरफळे, चिंच (आमटाण), याचबरोबर गावठी वांगी, भेंडीही मोठय़ा प्रमाणात विक्रीस होती. रताळी 100 ते 140 रुपये किलो, कोकम 130 ते 200 रुपये पट, तिरफळ 30 रुपये वाटी, वांगी 100 रुपये वाटा तसेच मोठी वांगी 50 रुपये प्रति अशा दरात विक्रीस होते. खोबरेल तेल छोटी बाटली 50 ते 100 रुपये प्रति तर एक लीटर गावठी खोबरेल तेल 180 ते 200 रुपये दराने विक्रीस उपलब्ध होते.
सुके मासेही विक्रीस
यंदा सुके मासेही म्हापसा बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात विक्रीस आले आहे. मोठे बांगडे 200 रुपये 4, मध्यम बांगडे 200 रुपयाना सहा तर लहान बांगडे 100 रुपयांना सहा दराने विक्रीस होते. याचबरोबर कोचुड्डे 100 रुपयांना 12, करमट 100 रुपये छोटी पड, कोळंबी 150 ते 200 रुपये पड या दराने विक्रीस होत्या. सुके मासे खरेदी करण्यासाठीही नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
गावठी रेडीमेड लोणच्याबरोबर विविध प्रकारचे गावठी तांदूळही बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध होते. गावठी कैऱयांचे लोणचे 50 ते 100 रुपये प्रति पिशवी दराने विक्रीस गेले तर जया, ज्योती, खोचरी आदी गावठी तांदूळ 60 ते 80 रुपये पड प्रमाणे विक्रीस होते. रसाळ फणस 50 रुपये 20 गर तर कापा फणस 100 रुपये 25 ते 30 गर दरात विक्रीस उपलब्ध होते. घरोघरी महिलांनी बनविलेल्या झाडू 150 ते 300 रुपये प्रति एक अशा दरात विक्रीस होते. गेल्या वर्षाच्या सुक्या मीटच्या 160 रुपये किलो प्रमाणे काही ठिकाणी होत्या. आमटीला लागणारी चिंचेची आमटाण 100 रुपये मोठा, मध्यम 80 व छोटा 60 रुपये गोळा प्रमाणे आमटाण विक्रीस होती. काजू, जगमे, चुर्णही बाजारपेठेत विक्रीस होती.
पाणी थंड करणारी मातीची भांडीही उपलब्ध
सध्या गर्मीचे (उन्हाळय़ाचे) दिवस सुरू झाल्याने उन्हाळय़ात पाणी थंड करून पिण्यासाठी मातीचे मटके 200 ते 400 रुपये पर्यंत मातीचा कोंब्याचे तोंड असलेले मटके 200 ते 500 रुपये पर्यंत विक्रीस होते. शिवाय आमटी बनविणारे मातीचे कुंडले 300 ते 500 रुपये प्रति दरात विक्रीस उपलब्ध होते. या व्यतिरिक्त अन्य मातीची भांडीही बाजारपेठेत उपलब्ध होती. छोटे मानकुरात आंबे 1200 रुपये डझन (चोटे) विक्रीस उपलब्ध होते. नीरफणस 200 ते 300 रुपये प्रति, वाली भाजी 100 रुपये 4 मोवळी, गावठी पपई 120 रुपये प्रति, तेंडली भाजी 100 रुपयांना 30 दरात विक्रीस उपलब्ध होती. मात्र एकूण आढावा घेता कोविड काळ संपता संपता पुरुमेंतचा बाजार करण्यासाठी नागरिकांनी मात्र म्हापसा बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी एकच झुंबड केलेली पहायला मिळाली.