सदस्य पुष्पराज शिंदे यांचा आरोप, जिल्हा परिषद सीईओकडे तक्रार
प्रतिनिधी/मिरज
तालुक्यातील म्हैसाळ येथे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत करण्यात आलेली तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड बेकायदेशीर असून सरपंच आणि त्यांच्या पतीने दमदाटी करून ही निवड केल्याचा आरोप म्हैसाळ ग्रामपंचायत सदस्य पुष्पराज शिंदे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांना लेखी तक्रार पत्र दिले आहे. तसेच ग्रामसभेत झालेल्या धक्काबुक्कीचा व दमदाटीचा व्हिडिओही त्यांनी सादर केला आहे.
सोमवारी 15 नोव्हेंबर रोजी म्हैसाळ ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतच म्हैसाळ गावासाठी तंटामुक्ती अध्यक्षपदाची निवड होती. सत्ताधारी गटाकडून एकनाथ बागडी यांचे नाव सुचविण्यात आले होते. पण उपस्थित ग्रामस्थांनी मात्र माझ्या बाजूने कौल दिला होता, असे पुष्पराज शिंदे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
असे असतानाही म्हैसाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच रश्मी शिंदे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत तसेच त्यांचे पती आबासाहेब शिंदे यांनी दमदाटी करून एकनाथ बागडी हेच तंटामुक्ती अध्यक्ष असल्याची निवड जाहीर केली. सदरची निवड पूर्णपणे बेकायदेशीर असून ही निवड रद्द करावी अशी मागणी पुष्पराज शिंदे यांनी केली आहे. म्हैसाळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत झालेल्या वादावादीचा तसेच धक्काबुक्कीचा व्हिडिओही त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला आहे.