प्रतिनिधी/मिरज
म्हैसाळ-सुभाषनगर रस्त्यावर डंपर आणि चारचाकीच्या अपघातात डॉ. ओंकार वाले (वय 35, रा. रमा उद्यान, मिरज) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या सोबत असलेले पोलिस कर्मचारी सनी स्वामी हे गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात नोंद झाली आहे.
ओंकार वाले हे बीएचएमएस असून, त्यांचा बेडग येथे दवाखाना आहे. त्यांच्या पत्नीही डॉक्टर आहेत. रविवारी ते आपले मित्र सनी स्वामी यांना घेऊन पोलो व्हॅगन चारचाकीतून सुभाषनगर रस्त्यावरुन म्हैसाळकडे निघाले होते. सध्या रस्त्यावर नियोजित महामार्गाचे काम सुरू आहे. ते शांताई गार्डनजवळ आले असता, आडव्या रस्त्यावरुन विजयनगरकडे जाणारा खडीचा डंपर आडवा आला. या दोन्ही गाड्यांची टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की, पोला व्हॅगनची पुढील बाजू चक्काचूर झाली आहे. तर डंपरचे पुढील चाक पंक्चर होऊन तसेच डंपरचा कणा तुटून ते रस्त्याकडेला जावून आदळले होते.