जिल्हय़ात 47 रुग्ण : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 215 वर : 8 नव्या रुग्णांची भर
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात शनिवारी कोरोनाच्या 8 नव्या रुग्णांची भर पडली. त्यापैकी 5 रुग्ण म्हैसूरमधील आहेत. त्यामुळे या जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची संख्या 47 वर पोहोचली आहे. दोन दिवसांत या जिल्हय़ात 10 रुग्णांची भर पडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ते सर्वजण एकाच कंपनीतील कामगार आहेत. तर बेंगळूरमध्ये 2, गुलबर्गा आणि बिदरमध्ये प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळून आला आहे. राज्यातील रुग्ण संख्या 215 वर पोहोचली आहे.
म्हैसूर जिल्हय़ातील नंजनगूड येथील ज्युबिलीयंट फार्मा कंपनी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. जिल्हय़ातील 47 पैकी 36 रुग्ण या कंपनीशी संबंधित आहेत. या कंपनीतील ज्या कर्मचाऱयामुळे कोरोनाचा फैलाव झाला होता, तो आता संसर्गमुक्त झाला आहे. उर्वरित तबलिग जमातच्या धार्मिक सभेत सहभागी झालेले रुग्ण आहेत. राज्य सरकारच्या मार्गसूचीचे काटेकोर पालन केले तरी नंजनगूडमध्ये कोरोनावर नियंत्रण आणणे अद्याप शक्य झालेले नाही. त्यामुळे म्हैसूर जिल्हाधिकाऱयांनी नंजनगूड शहर आणि शहरालगत असणाऱया वसाहती क्लस्टर म्हणून घोषित केल्या आहेत.
बिदरमध्ये 50 वर्षीय महिलेला संसर्ग
बिदरमध्ये 50 वर्षीय महिलेला भावाच्या पत्नीमुळे संसर्ग झाला आहे. बेंगळूरमध्ये 32 वर्षीय युवक तसेच 10 वर्षीय मुलगा आणि गुलबर्ग्यात 38 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत 37 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर 6 जण मृत्यूमुखी पडले आहेत.