वार्ता-जनसंपर्कमंत्री सी. सी. पाटील यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
म्हैसूरमध्येच चित्रनगरी (फिल्मसिटी) निर्माण करण्यात येणार आहे, अशी माहिती वार्ता आणि जनसंपर्क खात्याचे मंत्री सी. सी. पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. मुख्यमंत्र्यांकडे याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या सूचनेवरून त्यांनी याबाबतची माहिती सभागृहाला दिली.
मुख्यमंत्र्यांनी याबाबत पुढाकार घेऊन संबंधित अधिकाऱयांना फिल्मसिटी निर्माण करण्यासाठी सूचना दिल्याबद्दल आपण म्हैसूर जिल्हय़ाच्या वतीने म्हैसूर जिल्हा पालकमंत्री म्हणून अभिनंदन करीत असल्याचे एस. टी. सोमशेखर यांनी सांगितले.
कर्नाटकात चित्रपट व्यवसायाचा विस्तार वाढत आहे. मात्र, राज्यात आतापर्यंत कोठेही फिल्मसिटी निर्माण झालेली नाही. ही कमतरता विचारात घेऊन म्हैसूरपासून 20 कि. मी. अंतरावरील हिम्मावू परिसरात 110 एकर जागेत फिल्मसिटी निर्माण केले जाणार आहे. ही योजना साकारण्यासाठी केआयएडीबीकडून जमिनीचे हस्तांतरणही करण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री सी. सी. पाटील यांनी याप्रसंगी दिली.
म्हैसूर शहर आणि परिसरात आतापर्यंत 100 हून अधिक चित्रपटांचे चित्रिकरण झाले आहे. चित्रिकरणासाठी राजवाडा, नंजुंडेश्वर मंदिर, प्राणी संग्रहालय, म्हैसूर विद्यापीठ, श्रीरंगपट्टण, कृष्णराजसागर जलाशय, तलकाडू, शिवनसमुद्र आदी उत्तम ठिकाणे येथे आहेत. त्यामुळे अनेक कन्नड सिनेकलाकारांनी म्हैसूरमध्येच फिल्मसिटी निर्माण करण्याची मागणी केली होती, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.