पुणे/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील एका समर्थकाने मोदी यांना देवाचा दर्जा देत चक्क ‘मोदी मंदिरा’ची उभारणी केली होती. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी औंध भागातील परिहार चौकात हे मोदी मंदिर उभारले होते. १ लाख ६० हजार रुपये खर्च करून हे मंदिर उभारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करत होते. अनेकजण येथे येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडत होते. तसेच विशेष म्हणजे मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही लावण्यात आलं आहे. पण पीएमओ ऑफिसच्या फोननंतर या मंदिरातून मोदींची मूर्ती हटवली आहे.
औंध परिसरात उभारण्यात आलेले हे मंदिर सर्वत्र चर्चेचा विषय ठरलं होतं. पण आता या मंदिरातील मूर्ती हटवण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर ही मूर्ती हटवण्यात आली आहे. पण राम मंदिर उभारणीची प्रेरणा घेत मोदी मंदिराची उभारणी करण्यात आल्याचा दावा मोदी समर्थकांकडून करण्यात आला होता.
दरम्यान, स्वातंत्र्य दिनापासून मंदिर सर्वासाठी खुले करण्यात आलेहोते. मयूर मुंडे यांनी मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता दर्शनी भागात लावण्यात आली आहे. तसेच शेजारील फलकावर मोदी यांच्या कार्याची माहिती देण्यात आली आहे. मंदिराची उभारणी खासगी जागेत करण्यात आल्याचा दावा केला होता.