लाल-पिवळा ध्वजाविरोधात जिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करणार
प्रतिनिधी / बेळगाव
महानगरपालिकेसमोर अनधिकृत लाल-पिवळा ध्वज काही कन्नडधार्जिण्या लोकांनी उभारला आहे. मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी हा ध्वज उभारला गेला आहे. त्यामुळे हा ध्वज हटवावा या मागणीसाठी सोमवार दि. 8 रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौक येथून या मोर्चाला सुरूवात होणार असून, मराठी भाषिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून आपली भाषिक अस्मिता दाखवून द्यावी, असे आवाहन म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
हा अनधिकृत ध्वज काढण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हा प्रशासनाला मुदतही दिली होती. परंतु प्रशासनाने ध्वज हटविण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. महानगरपालिकेवर मराठी भाषिकांचे वर्चस्व असल्यामुळे हे खुपत असल्यानेच अशा कुरापती केल्या जात आहेत. यामुळे शहरात नाहक भाषिक तेढ निर्माण झाली आहे. हा ध्वज उभा केल्यामुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप आहे. या अनधिकृत ध्वजाविरोधात सोमवारी भव्य असा महामोर्चा काढण्यात येणार आहे.
महामोर्चाचा धसका घेऊन प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. परंतु मराठी भाषिक मात्र मोर्चा काढण्यावर ठाम आहे. धर्मवीर संभाजी चौक येथून कॉलेजरोडमार्गे चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाची सांगता होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी मोठय़ा संख्येने सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीसोबतच मराठी भाषिक संघटना जनजागृती करीत आहेत. बेळगाव शहरासोबतच ग्रामीण भागातूनही मोठय़ा संख्येने मराठी भाषिक यामध्ये सहभागी होणार आहेत.
गावो गावी, गल्लो गल्ली बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली आहे. त्याचसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जागृती करण्यात आली आली. महामोर्चा यशस्वी करणारच असा निर्धार मराठी भाषिकांनी केला आहे.
म. ए. समिती महिला आघाडी
महानगरपालिकेसमोर अनधिकृत ध्वज लावण्यात आला आहे. केवळ मराठी भाषिकांना डिवचण्याचा हा काही संघटनांच्या म्होरक्मयांचा प्रयत्न आहे. परंतु अशी भाषिक गळचेपी बेळगावमध्ये सहन केली जाणार नाही. हा ध्वज त्वरित हटवावा यासाठी सोमवार दि. 8 मार्च रोजी भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सीमाभागातील मराठी भाषिक महिलांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन म. ए. समिती महिला आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.
बेळगावमध्ये या ना त्या कारणाने मराठी भाषिकांची गळचेपी करण्याचे प्रयत्न वारंवार केले जातात. परंतु आजतागायत मराठी भाषिकांनी अशा प्रकारांना थारा न देता आपला भाषिक लढा सुरू ठेवला आहे. महानगरपालिकेवर मराठी भाषिकांचे वर्चस्व असल्याने हे सहन न झाल्यामुळे काही संघटना भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे बेळगावमध्ये शांततापूर्ण वातावरण नांदायचे असेल तर हा ध्वज त्वरित हटवावा, तसेच सोमवारच्या मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणु किल्लेकर यांनी केले आहे.
मराठी युवा मंच
महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी पुकारलेल्या महामोर्चामध्ये मोठय़ा संख्येने सीमावासियांनी सहभागी होण्याचे आवाहन मराठी युवा मंचतर्फे करण्यात आले आहे. सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी वेळीच हा झेंडा काढण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे 8 मार्च रोजी भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी सीमाभागातील सर्व मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनील जाधव, कार्याध्यक्ष राजु पावले, शहर अध्यक्ष रवी निर्मळकर यांच्यासह कार्यकारिणीने केले आहे.
शिवसेनेचे आवाहन
सोमवारी काढण्यात येणाऱया महामोर्चामध्ये मोठय़ा संख्येने शिवसैनिक सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातून येणाऱया शिवसैनिकांवर निर्बंध लादण्यात आले असले तरी शिवसैनिक महामोर्चात सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करणारच असा निर्धार करण्यात आला आहे. या महामोर्चाला मराठी भाषिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संपर्क प्रमुख अरविंद नागनूरी व जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांनी केले आहे.