पाच खटल्यांच्या सुनावण्या ढकलल्या पुढे
प्रतिनिधी/ बेळगाव
म. ए. समितीचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर विविध गुन्हे दाखल केले होते. या खटल्यांची सुनावणी वेगवेगळय़ा न्यायालयांमध्ये सुरू आहे. शनिवारी तब्बल पाच खटल्यांची सुनावणी होती. मात्र या सर्व खटल्यांच्या सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
नोटा प्रकरण खटला
बेळगाव लोकसभा निवडणूक 2013 साली जाहीर झाली होती. त्यानंतर म. ए. समितीने नोटाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. याप्रकरणी म. ए. समितीचे कार्यकर्ते मधू कणबर्गी यांनी याबाबतची परिपत्रके वाटली म्हणून त्यांच्यावर खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी तिसरे जेएमएफसी न्यायालयामध्ये सुरू आहे. शनिवारी याची तारीख होती. मात्र हा खटला पुन्हा पुढे ढकलण्यात आला असून 21 डिसेंबर 2021 रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
काळादिन खटला
1 नोव्हेंबर 2017 या काळय़ादिनी मूक सायकलफेरी काढण्यात आली होती. ही फेरी यशस्वी झाली. मात्र म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि धुडगूस घातला म्हणून मारहाण केली. त्यानंतर शहापूर पोलीस स्थानकामध्ये 43 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी जेएमएफसी तृतीय न्यायालयामध्ये सुरू आहे. दत्ता येळ्ळूरकरसह 43 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणीही पुढे ढकलण्यात आली आहे. 29 नोव्हेंबर 2011 रोजी खटल्याची सुनावणी होणार आहे.
महामेळावा खटला
कर्नाटक सरकारने सुवर्णसौधमध्ये अधिवेशन भरविण्याचे जाहीर केले. त्याला तोडीसतोड म्हणून म. ए. समितीने 2017 साली महामेळावा भरविला. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकामध्ये म. ए. समितीच्या नेत्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला. दीपक दळवी, मनोहर किणेकर, दिगंबर पाटील, मालोजी अष्टेकर, निंगोजी हुद्दार, प्रकाश मरगाळे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी जेएमएफसी चतुर्थ न्यायालयामध्ये सुरू आहे. ही सुनावणी पुढे ढकलली असून 21 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे.
2018 सालीही महामेळावा भरविण्यात आला होता. याप्रकरणीही म. ए. समितीच्या नेत्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. 2018 सालच्या गुन्हय़ामध्ये माजी आमदार दिगंबर पाटील यांना वगळून इतरांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याची सुनावणीही शनिवारी जेएमएफसी चतुर्थ न्यायालयामध्येच होती. मात्र ती सुनावणीही पुढे ढकलण्यात आली असून 21 डिसेंबर 2021 रोजी सुनावणी होणार आहे. या सर्व खटल्यांमध्ये ऍड. महेश बिर्जे, ऍड. एम. बी. बोंदे आणि ऍड. शंकर पाटील हे काम पाहत आहेत.
काळादिन मॅसेज खटल्याची सुनावणीही लांबणीवर
1 नोव्हेंबर 2017 रोजी काळय़ादिनी दत्ता येळ्ळूरकर, केदारी करडी, मारुती पाटील यांनी मॅसेज पाठविला म्हणून त्यांच्यावर खडेबाजार पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी तिसरे जेएमएफसी न्यायालयामध्ये सुरू आहे. शनिवारी त्याची सुनावणी होणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली असून 17 डिसेंबर 2021 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या खटल्यात ऍड. महेश बिर्जे व ऍड. प्रताप यादव हे काम पाहत आहेत.