प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विमल फौंडेशनचे अध्यक्ष दीपक जाधव यांनी मराठा मंदिर येथील म. ए. समितीच्या कोविड सेंटरला पाच ऑक्सिजन सिलिंडर्स व 15 हजार रुपये आणि 10 हजार रुपये रुग्णांच्या जेवणासाठी मदत म्हणून दिले आहेत.
यावेळी दीपक जाधव म्हणाले, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो, या सामाजिक बांधिलकीतून विमल फौंडेशनच्या पदाधिकाऱयांनी हा निधी म. ए. युवा समितीचे पदाधिकारी मदन बामणे, बाळू जोशी, उपाध्यक्ष सागर पाटील, उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. 25 हजारांचा धनादेश मराठा मंदिर येथे रुग्णांच्या सेवेकरिता दिला आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेने बेळगावात कहर केला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. अनेकांना ऑक्सिजन, औषधे व बेड मिळत नाहीत. अशातच अनेकजण गरजूंच्या मदतीला धावून आले आहेत. आता विमल फौंडेशनचे पदाधिकारी दीपक जाधव, सुनील जाधव, अमर सरदेसाई, सतीश नाईक यांनी कोरोनाविरुद्धच्या लढय़ात मदत केली आहे.