बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्षांनी केला खुलासा
प्रतिनिधी /बेळगाव
ग्राम पंचायतच्या कामासाठी ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळी त्यांनी व त्यांचा मुलगा तसेच कार्यकर्त्यांनी माझ्या गळय़ात काँग्रेसचा पट्टा घालून पुष्पगुच्छ दिले. त्यानंतर मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, अशा अनेक वृत्तपत्रांमधून आणि माध्यमांतून बातम्या दिल्या. मात्र मी म. ए. समितीशी एकनिष्ठ असून कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचा पट्टा गळय़ात घालणार नाही, असे बेळवट्टी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष म्हाळू मजुकर यांनी स्पष्ट करत गाव कमिटीकडे आपला खुलासा दिला आहे.
मी गेली 20 वर्षे म. ए. समितीमध्ये काम करत आहे. म. ए. समितीमुळेच ग्राम पंचायत अध्यक्ष झालो आहे. त्यामुळे मी म. ए. समितीशी कधीही गद्दारी करणार नाही. ग्राम पंचायत अध्यक्ष असल्यामुळे कामानिमित्त आमदारांकडे गेलो असता ही घटना घडली आहे. त्यामुळे गैरसमज पसरला आहे. त्यासाठीच आम्ही आता ग्रामस्थांकडे खुलासा दिला असून ग्रामस्थ जो निर्णय देतील, तो मान्य करणार आहे. ग्रामस्थांच्या मार्गदर्शनानुसारच पुढील वाटचाल करणार आहे. म. ए. समिती कधीही सोडणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उपस्थित राहून त्यांनी हा खुलासा केला आहे.
यावेळी म. ए. समितीचे नेते शिवाजी सुंठकर, ग्राम पंचायत सदस्य रेश्मा कुलम, रेणुका सुतार, अनुराधा कांबळे, विठ्ठल पाटील, रुपा सुतार, नारायण गोडसे, विठ्ठल मजुकर, नाना मजुकर, विठ्ठल गोडसे, यल्लाप्पा भरमु बेळगावकर, सातेरी कुलम, गणपती मजुकर, मोहन मजुकर, प्रकाश सुतार, रामू पाटील, कल्लाप्पा पाटील, किसन सुंठकर, मोहन मजुकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.