बंद गेटवरून उडय़ा मारण्याचा प्रकार : विद्यार्थ्यांसाठी उद्यान खुले ठेवण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
एसपीएम रोडवर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासह महात्मा गांधी उद्यान निर्माण करण्यात आले आहे. या दोन्ही उद्यानांत लहान मुलांसह नागरिकांची गर्दी असते. मात्र गांधी उद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने कपिलेश्वर कॉलनीकडील प्रवेशद्वार मोडकळीस आले आहे. या मोडकळीस आलेल्या प्रवेशद्वाराजवळ शाळकरी मुले गेटवरून उडय़ा टाकून खेळत असल्याने धोका निर्माण झाला आहे.
उद्यानाच्या देखभालीसाठी माळय़ांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरीदेखील शाळकरी मुले बंद असलेल्या गेटवर चढून प्रवेशद्वारावर असलेल्या फलकाला लोंबकळत आहेत. सदर फलकाचे खांब व फलक गंजला असून, कोणत्याही क्षणी मोडण्याचा धोका आहे. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर धावत जाऊन गेटवरून उडय़ा मारणाऱया व लोंबकळणाऱया विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि महात्मा गांधी उद्यान ही दोन्ही उद्याने लगत असून, उद्यानाच्या देखभालीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या उद्यानांना 3 ठिकाणी प्रवेशद्वार आहेत. मात्र दोनच प्रवेशद्वाराने सोडले जाते. कपिलेश्वर कॉलनीजवळ नाल्याशेजारी असलेले गेट कायम बंद असते. मात्र परिसरात असलेल्या शाळा सुटल्यानंतर मुले खेळण्यासाठी धावत जातात. पण हे गेट बंद रहात असल्याने गेटवर चढून उद्यानामध्ये प्रवेश करतात. या दरम्यान उद्यानात कोणीच नसल्याने शाळकरी विद्यार्थी हा प्रकार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. पण यामुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे प्रवेशद्वार खुले करून शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मुभा देण्याची गरज आहे. पण महापालिका प्रशासनाने देखभालीसह प्रवेशद्वार खोलण्याकडे कानाडोळा केला आहे.
तसेच या ठिकाणी असलेला उद्यानाचा नामफलक बदलण्याची गरज आहे. गेटवरून उडय़ा मारणाऱया प्रकाराकडे शाळा व्यवस्थापन मंडळानेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबत विद्यार्थ्यांसह महापालिका प्रशासनाला सूचना देणे आवश्यक आहे. या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देवून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.