क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
एसआरएस स्पोर्ट्स क्लब आयोजित तिसऱया एसआरएस चषक सिक्स ए साईड फुटबॉल स्पर्धेत यंग चॅम्प्स शास्त्रीनगर संघाने एसआरएस बेळगाव संघाचा टायब्रेकरमध्ये 2 -1 असा पराभव करून एसआरएस चषकासह 31 हजार रूपयाचे रोख रक्कमेचे बक्षिस पटकाविले. अखिलेश अष्टेकर याला उत्कृष्ट खेळाडूचे बक्षिस देण्यात आले.
संभाजी उद्यान महाद्वाररोड येथे आयोजित या स्पर्धेत 32 संघांनी भाग घेतला होता. पहिल्या उपांत्य सामन्यात यंग चॅम्प्स शास्त्रीनगर संघाने रोहन डिफेंडर संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2 तर दुसऱया उपांत्य सामन्यात एसआरएस बेळगाव संघाने बुफा संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामना यंग चॅम्प्स शास्त्रीनगर व एसआरएस बेळगाव यांच्यात झाला. या सामन्यात पाचव्या मिनिटाला एसआरएसच्या जे. बी. पाटील याने मारलेला फटका गोलरक्षकाने उत्कृष्ट अडविला. दुसऱया सत्रात 14 व्या मिनिटाला अखिलेश अष्टेकरने गोल करण्याची नामी संधी दवडली. गोलफलक कोरा राहिल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये यंग चॅम्प्स शास्त्रीनगर संघाने 2-1 असा पराभव केला.
यंग चॅम्प्सतर्फे अखिलेश अष्टेकर व कौशिक पाटील यांनी गोल केले. एसआरएसतर्फे अमृतने गोल केला. प्रमुख पाहुणे मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विठ्ठल हावण्णावर, योगेश पाटील, श्रीकांत कुरीहाळकर यांच्या हस्ते विजेत्या यंग चॅम्प्स शास्त्रीनगर संघाला 31 हजार रूपये रोख, आकर्षक चषक तर उपविजेत्या एसआरएस बेळगाव संघाला 15 हजार रूपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले.
उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून हार्दिक, उत्कृष्ट संघ राजाधिराज शिवाजीनगर, सर्वाधिक गोल अभिषेक चेरेकर, उत्कृष्ट फॉरवर्ड अखिलेश अष्टेकर, उत्कृष्ट डिफेंडर प्रतिक खाडे यांना चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अभिषेक चेरेकर, कौशिक पाटील, उमेश मजुकर यांनी काम पाहिले. यंग चॅम्प्सतर्फे अखिलेश अष्टेकर, शुभम बांदेकर, श्रेयस तिवारी, शशांक गोळगुंडी, सौरभ धामणेकर, पिटर डिसुझा यांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ओंकार शिंदोळकर, कौस्तुभ गेंजी, सिद्धार्थ शिंदे, जयस सांबरेकर, गौरव पाटील, सायमोल, यश कदंबा, यश सुतार व मयुर मंडलिक यांनी विशेष परिश्रम घेतले.