नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रत्येक हंगामात चाहत्यांच्या विशेष पसंतीला उतरत आलेल्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील यंदाची आवृत्ती रद्द करत असल्याची घोषणा आयोजकांनी शनिवारी केली. केंदीय मार्गदर्शक तत्वे व खेळाडूंचे आरोग्य, सुरक्षितता या बाबी लक्षात घेत हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्रकातून स्पष्ट केले. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, यंदा जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा होणे अपेक्षित होते. पण, कोव्हिड-19 च्या संकटामुळे स्पर्धा रद्द करावी लागली आहे. या स्पर्धेत बंगाल वॉरियर्स विद्यमान विजेते आहेत.
यापूर्वी, भारतातील प्रतिकूल स्थितीच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन कबड्डी फेडरेशनने यंदा ऑक्टोबरमध्ये लंकेत ही स्पर्धा भरवण्याची तयारी दर्शवली होती. पण, स्पर्धा लंकेत होणार असल्याच्या निव्वळ अफवा आहेत, असे आयोजकांतर्फे जाहीर केले गेले भारतात ज्यावेळी स्पर्धा भरवण्यासाठी आदर्शवत वातावरण असेल, त्यावेळी आपण स्पर्धेबाबत निर्णय घेऊ, असे आयोजकांनी याप्रसंगी नमूद केले आहे.