26 रोजी उद्घाटन, दोन दिवस भरगच्च कार्यक्रम
प्रतिनिधी /पणजी
पर्वरी येथील विद्या प्रबोधिनी महाविद्यालयातर्फे आयोजित 21 वे युवा कोंकणी साहित्य संमेलान येत्या दि. 26 रोजी होणार आहे. गोवा कोकणी अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे दोन दिवशीय निवासी संमेलन असेल, अशी माहिती प्रा. डॉ. भूषण भावे यांनी दिली.
बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संमेलनाध्यक्षपदी नमन सावंत धावस्कर यांची निवड करण्यात आली असून 26 रोजी सकाळी 10 वाजता प्रमुख पाहुणे दीपक करंजीकर यांच्याहस्ते उद्घाटन होईल, अशी माहिती भावे यांनी दिली.
अन्वेषा सिंगबाळ यांना युवा साहित्य पुरस्कार प्रदान, युवांकुर स्मरणिका तसेच नवोदित लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन, प्रकट मुलाखत आदी कार्यक्रम होती. त्याशिवाय दु. 2.30 वाजता देविदास कदम, माया खरंगटे, नागेश करमली यांच्या जाहीर मुलाखती अनंत अग्नी, तन्वी कामत बांबोळकर घेतील. 4 वाजता प्रकाश पर्येकर यांचे बिजभाषण. सायंकाळी 5 वाजता निमंत्रित तसेच प्रस्थापितांचे कविता संमेलन आणि 6 वाजता मनोरंजनाचे कार्यक्रम होतील, अशी माहिती भावे यांनी दिली.
दुसऱया दिवशी दि. 27 रोजी सकाळी 9.30 वाजता कार्यशाळा. त्यानंतर अंजू साखरदांडे, अजय बुवा, ज्योती कुंकळकर यांचे कथा परीक्षण व मार्गदर्शन. त्यानंतर उदय म्हांबरे, पूर्णानंद च्यारी, नूतन साखरदांडे यांचे कविता परीक्षण व मार्गदर्शन. हनुमंत चोपडेकर, शैलेंद्र मेहता, ग्वादालूप डायस यांचे पुस्तक परीक्षण व मार्गदर्शन होईल. रमेश घाडी, दिलीप बोरकर, दिलीप धारगळकर यांचे व्यक्तीचित्रण परीक्षण व मार्गदर्शन होईल.
दुपारी 2.30 वाजता प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते बक्षीस वितरणाने संमेलनाचा समारोप होईल, असे भावे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस कोंकणी अकादमीचे अध्यक्ष अरूण साखरदांडे, संजय वालावलकर, दर्शन कांदोळकर व दर्शना मांद्रेकर यांची उपस्थिती होती.