प्रतिनिधी/ सातारा
अवघ्या सत्तर दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट पसरले आहे. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना मनाई तसेच कच्च्या मालाचा अभाव निर्माण झाल्याने कुंभारवाडयात शुकशुकाट पसरला आहे. यामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरी करण्याचे संकेत आहेत.
गतवर्षी आलेल्या महापूराचा फटका गणेशोत्सवाला बसला होता. तोच कोरोना वायसरमुळे पुन्हा बसत आहे. यंदा गणरायाचे आगमन 22 ऑगस्टला होणार आहे. दरवर्षी करंजे, गडकर आळी, बुधवार नाका, केसरकर पेठ येथील कुंभारवाडय़ात मार्च महिन्यांच्या सुरूवातीपासून मुर्ती बनवण्याची लगबग सुरू होते. साताऱयातील मानाचे गणपतीसह इतर मंडळाकडून विविध आकारातील आकर्षक मुर्ती बनवण्याची मागणी केली जाते. यंदा मात्र दोन महिने संपत आले तरी लॉकडाऊन संपलेले नाही. गणेशमुर्ती तयार करण्यासाठी राजस्थानवरून प्लॅस्टर ऑफ पॅरिस, तर आंध्र प्रदेशमधून येणारा कच्चा माल वाहतूकीच्या बंदीमुळे अडकून पडला आहे. नागोठणे, पेण, पनवेल, वाशी व दादर मार्केटमधून प्लॅस्टर ऑफ पॅरिस व रंग इमिटेशन ज्वेलरीचे साहित्य मागवेल जाते.
कोरोनाचे सावट प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या कच्च्या मालात व रंगात झालेली वीस टक्के भाववाढ, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना प्रदूषण नियत्रंण मंडळाने आक्षेप यामुळे कुंभारवाडय़ात मूर्तीकारांच्या अडचणी वाढल्या आहेत. जिह्यात सुमारे आठ हजार टन प्लॅस्टरची आवक होत असते. आता कच्च्या मालाचा अभाव आणि इतर अडचणींमुळे यंदा मूर्ती बनवण्याच्या कामात अनेक आव्हाने आहेत.
यंदा मूर्ती बनवण्यावर येणार मर्यादा…
सातारा जिह्यात 3 हजार 526 तर सातारा शहरात साडेतीनशेहून अधिक सार्वजनिक मंडळांची नोंद आहे. पाच मानाच्या सार्वजनिक मंडळाच्या फायबरच्या गणपतीच्या मूर्ती तयार असतात. त्यामुळे केवळ 69 दिवसांत सगळया मंडळांच्या आठ फूटापेक्षा अधिक उंच मूर्ती तयार होऊ शकणार नाहीत. असे मूर्तीकारांनी मंडळांना सांगितले आहे. लॉकडाऊनमुळे गणेशमुर्तीसाठी आवश्यक कच्च्या मालाची वाहतूक होत नसल्याने मूर्ती तयार करण्यात येणाऱया अडचणींचा हिशेब जुळवणे मूर्तीकारांसाठी अडचणीचा विषय आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणरायाच्या सार्वजनिक उत्सवावर व मूर्तीच्या उंचीवर मर्यादा येणार आहेत.