फोंडय़ातील मुख्य रस्त्यासह दाग, कवळे, बांदोडय़ातील रस्त्यांची दुरावस्था
प्रतिनिधी/ फोंडा
दाग-फोंडा, कवळे, बांदोडा, रामनाथी, कपिलेश्वरी, ढवळी या बाजूने कुठेही जा, खड्डय़ांशिवाय एकही रस्ता सापडणार नाही. गेली एकदोन नव्हे तब्बल पाच वर्षे या भागातील रस्त्यांची ही खराब स्थिती आहे. मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामामुळे पावलोपावली तयार झालेले उंचवटे व खड्डे यामुळे वाहनचालकांना कंबरमोड व मानदुखीचा प्रवास नित्याचा बनला आहे. यंदाच्या पावसाळय़ातही त्यापासून सुटका नाही.
मलनिस्सारण प्रकल्पाचे काम संपणार तरी कधी ?
पावसाळा उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे व मल्लनिस्सारण प्रकल्पाचे काम रेंगाळत पडले आहे. हे काम संपल्याशिवाय रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचा मुहुर्त सापडणार नाही. तोपर्यंत अजून एक पावसाळा खड्डेमय रस्त्यांपासून नागरिकांची सुटका नाही. गेल्या वर्षीप्रमाणे पावसाळा लांबल्यास परिस्थिती अधिकच बिकट बनणार आहे. मागील वर्षीच्या मे महिन्यात प्रकल्पाचे काम पूर्ण होणार अशी डेड लाईन देण्यात आली होती. त्यानंतर एक पावसाळा वाहनचालकांनी हाल सोसले. फोंडय़ातील काही संतप्त नागरिकांनी प्रकल्पाच्या अभियंत्याला फैलावर घेतल्यानंतर डिसेंबरमध्ये काम संपणार असे लेखी पत्रच त्यांनी दिले होते. ही डेड लाईनही उलटली. आता पावसाळा तोंडावर आल्याने प्रत्यक्षात हे काम कधी संपणार याचे उत्तर कुणाकडेच नाही. दाग येथील पाणी विभागाजवळ, तिस्क येथील न्यायालयासमोर व कपिलेश्वरी उड्डाण पुलाजवळील चेंबर्सचे खोदकाम गेली तीन वर्षे सुरुच आहे. तिस्क ते दागपर्यंत आत्तापर्यंत एकाचठिकाणी किमान दहावेळा वारंवार खड्डे खोदून मातीचे ढिगारे उपसले जात आहेत. या कामासाठी अडथळे उभारुन रस्ता एकाबाजूने बंद केल्याने वाहतुकीसाठी जी एक बाजू मोकळी आहे, त्या रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाली आहे. शिवाय बऱयाचठिकाणी गटार व्यवस्थाही कोलमडून पडलेली दिसते.
उंचवटे आणि धोकादायक खड्डे
फोंडा ते दुर्भाट मुख्य रस्त्यावर तिस्कपासून पाऊणवाडा-कवळेपर्यंत पावलोपावली असलेल्या चेंबर्सच्या लोखंडी झाकणांनी डोकी वर काढल्याने वाहनचालकांना हे उंचवटे चुकविण्यासाठी कसरत करावी लागते. हे उंचवटे चुकविताना बऱयाचवेळा समोरासमोर येणाऱया वाहनांना अपघातांचा कायम धोका असतो. कवळे येथील शांतादुर्गा मंदिर परिसर, रामनाथी, कदंब बसस्थानक ते काशिमठ बांदोडा या प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचीही अशीच दुरावस्था झाल्याने वाहतुकीसाठी एकही रस्ता सुरक्षित राहिलेला नाही. काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध केबल टाकण्यासाठी खोदलेल्या जागी चर तयार झाल्याने दुचाकीचालकांना त्यापासून कायम धोका संभवतो.
पर्यटकांनाही खड्डय़ांचे दर्शन
कवळे, बांदोडा, रामनाथी, नागेशी, कपिलेश्वरी या भागात राज्यातील सर्व प्रमुख मंदिरे असल्याने सध्या सुरु असलेल्या सुट्टीत पर्यटकांची वर्दळ असते. कर्नाटक, महाराष्ट्र व इतर भागातून देवदर्शनासाठी येणाऱया पर्यटकांची वाहने या भागात मोठय़ाप्रमाणात येतात. पर्यटकांना या खड्डय़ातून धक्के खात प्रवास करावा लागत आहे.
पावसाळय़ात शाळकरी मुलांचे हाल
कोरोनामुळे मागील तीन वर्षे शाळा जेमतेम सुरु होत्या. प्राथमिक व पूर्वप्राथमिकचे वर्ग बंद होते. येत्या 6 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. त्यामुळे नव्याने शाळेत दाखल होणाऱया व प्राथमिक शाळेत शिकणाऱया मुलांना संपूर्ण पावसाळा खड्डेमय रस्त्यावरुन प्रवास करावा लागणार आहे. दुचाकीवरुन मुलांना शाळेत सोडायला येणाऱया पालकांचे विशेषतः महिलांचे अधिक हाल होणार आहेत.
शहरातील मुख्य रस्त्याची दुर्दशा
फोंडा शहरातील काही रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण पूर्ण झाले तरी, वारखंडे येथील हनुमान मंदिर ते वरचा बाजारपर्यंतच्या मुख्य रस्त्याचे काम रखडले आहे. आल्मेदा हायस्कूल, बोरकर पेट्रोलपंप तसेच मुख्य बाजारपेठेतील रस्ता उखडला आहे. रहदारीने नियमित गजबजलेल्या या रस्त्यावर बऱयाचठिकाणी तयार झालेल्या उंचवटय़ामुळे वाहनचालकांना या मार्गातून प्रवास करणे मोठी डोखेदुखी बनली आहे. पावसाळय़ापूर्वी या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण न झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनणार आहे.