गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती
प्रतिनिधी / पणजी
गोवा बोर्डाने नवीन शैक्षणिक वर्षातील एप्रिल-मे 2022 मध्ये होणाऱया दहावी-बारावी परीक्षांच्या 30 टक्के अभ्यासक्रमात कपात केली आहे. कोरोनाचे संकट, पुढे गेलेले शैक्षणिक वर्ष, आगामी विधानसभा निवडणूक या सर्व गोष्टींचा विचार करून ही कपात करण्यात आल्याची माहिती गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (गोवा बोर्ड)च्या सूत्रांनी दिली. या सदंर्भात परिपत्रक जारी करण्यात आले असून ते सर्व शाळांना पाठविण्यात आले आहे.
मागील शैक्षणिक वर्षासाठी 2020-21 अशा प्रकारे अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्यात आली होती. तीच कपात आगामी नवीन शैक्षणिक वर्षात कायम ठेवण्यात आली असून ती पद्धत दहावी – बारावी अभ्यासक्रमासाठी लागू आहे. मागील वर्षी केंद्रीय शिक्षण मंडळाने देखील अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केली होती. त्या धर्तीवर गोवा बोर्डाने कपात अंमलात आणली होती. आता ती कपात आगामी वर्षात केली जाणार आहे.
दहावी-बारावी परीक्षेतील सर्व प्रमुख विषयांच्या अभ्यासक्रमात कपात करण्यात आली होती. आता दहावी-बारावी परीक्षाच रद्द करण्यात आल्यामुळे कपात झालेल्या अभ्यासक्रमाला फारसा अर्थ राहिलेला नाही. आता आगामी शैक्षणिक वर्ष 2021-22 उशिराने सुरू होणार असल्याने दहावी-बारावी अभ्यासक्रम पुन्हा एकदा 30 टक्के कापण्याचे ठरविण्यात आले आहे. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवून पूर्ण होणार नसल्याने हा कपातीचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, रद्द करण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षांचा निकाल लावण्यासाठी बोर्डाकडे काही सूचना आल्या असून विचाराधीन असल्याची माहिती गोवा बोर्डाच्या सूत्रांनी दिली. दोन्ही परीक्षांचा निकाल गुणांकन करण्याचे काम दहावी-बारावीच्या शाळांमधून शिक्षकांनी सूरू केले असून बोर्डानेही त्याचा मसुदा तयार केला आहे. पण यावर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब केलेले नाही.