प्रतिनिधी/ सातारा
गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर नवरात्रोत्सवाचे वेध आता सर्वांना लागले आहेत. यंदा नवरात्रोत्सव गुरुवार, 7 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. नवरात्रोत्सवात दांडीया, गरबा यासोबत नऊ रंगाचे कपडे घालण्याची महिला वर्गामध्ये उत्सुकता असते. सध्या लॉकडाऊन जरी उघडले असले तरी मागील वर्षा प्रमाणे यंदाही विविध नियमावली लागु करण्यात आली आहे.
सातारा शहरात एकुण 70 मंडळे कार्यान्वयित आहेत, या मंडळांना नवरात्र उत्सवाबाबत नियमावली व सुचना देण्याकरीता मंडळांच्या पदाधिकाऱयांची बैठक नुकतीच पोलिस प्रशासनातर्फे घेण्यात आली होती. कोरानाची टांगती तलवार अद्याप कायम असल्याने नागरिकांची गर्दी होईल असे कोणतेच कार्यक्रम न राबविण्याच्या सुचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. उत्सवादरम्यान प्रशासनाच्या करडी नजर ही मंडळांच्या सर्व उपक्रमांवर असणार आहे, तसेच नियमांचे उलंघन करणाऱयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
विविध सुचना देण्यात परिपत्रकाद्वारे जारी केल्या असुन यामध्ये नवरात्रोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी पालिकेकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. पालिकेने निश्चित केलेल्या आकारमानानुसारच मंडप परवानगी दिली जाणार आहे. पर्यावरणाचा विचार करता मूर्ती शाडूची असावी, सजावट पर्यावरणपूरक असावी, सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार फूट उंचीची, तर घरगुती मूर्ती दोन फूट उंचीची असणेही आवश्यक आहे, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे
तसेच देवीच्या आगमना बरोबरच विसर्जना दरम्यान काढण्यात येणाऱया मिरवणुकांवर ही बंदी घालण्यात आली. करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात एकत्र येऊन गदी करुन उत्सव साजरा करू नये अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहे. नवरात्रोत्सव साजरा करताना नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
नवरात्रची चाहुल लागताच शहरातील कला व वाणिज्य महाविद्यालय, अनंत इंग्लिश स्कुल, न्यु इंग्लिश स्कुल, शानबाग, शाहूनगर आदी भागात प्रतिवर्षी दांडियाची धुम ऐकावस मिळत होती. पण यंदा मात्र मागील वर्षी प्रमाणे येथे शांतता असणार आहे. यंदाही दांडीयाला बंदी घालण्यात आल्याने अनेक तरूण वर्गांमध्ये निराशाचे सुर उमटत आहेत.
शासनाच्या नियमांचे काटेकोट पणे पालन
मागील 14 वर्षापासुन आमच्या मंडळातर्फे मंगळवार पेठ येथे नवरात्रोत्सवा दरम्यान दुर्गादेवी मुर्तीची स्थापना करण्यात येते. यंदा मंडळातर्फे मुर्तीची उंची दोन फुटाची ठेवण्यात आली असुन, शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन करण्यात येणार आहे.
सचिन भोसले-अध्यक्ष
जय महाराष्ट्र कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ