कोल्हापूर / प्रतिनिधी
सौंदत्ती (जि. बेळगाव) येथील रेणुकादेवीची दरवर्षी डिसेंबरमध्ये होणारी यात्रा यावर्षीही रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या होमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून यंदाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मंदिर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. बेळगाव जिल्हा प्रशासनाने या निर्णयाची माहिती एका पत्राव्दारे दिली आहे. हे पत्र कोल्हापूरच्या करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संस्थेलाही प्राप्त झाल्याची माहिती अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली.
सौंदत्तीच्या डोंगरावरील यात्रेसाठी महाराष्ट्रासह स्थानिक कर्नाटकातील लाखो भाविक दरवर्षी जात असतात. डिसेंबर महिन्यातील सौंदत्ती यात्रेला वेगळे महत्वही आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील हजारो भाविक या यात्रेच्या निमित्ताने रेणुकादेवीच्या दर्शनाला जात असतात. लिंब नेसणे, परडी भरणे, नैवेद्य असे धार्मिक विधी, कार्यक्रमही या काळात होत असतात. गतवर्षी 2020 मध्ये कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग संपल्यानंतर रेणुका मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. पण आता पुन्हा नव्याने कोरोनाचा ओमीक्रॉन व्हेरिएंट आल्याने कोरोनाची साथ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेला होणारी गर्दी टाळण्यासाठी त्याबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी यंदाच्या वर्षीही होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात बेळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थान समितीचे चेअरमन तथा उपायुक्तांनी पत्रक काढून निर्णयाची माहिती कळविली आहे. या निर्णयामुळे लाखो भाविकांना यंदाच्या वर्षीही यात्रेला आणि रेणुकादेवीच्या दर्शनाला मुकावे लागणार आहे.
दरम्यान, यात्रा रद्द झाल्यानंतर भाविकांना काही माहिती हवी असल्यास उदय पाटील, श्रीकांत कारंडे, प्रशांक खाडे, किरण मोरे, संजय मांगलेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.