तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधींना आज शनिवार 11 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. मात्र गतवर्षीप्रमाणे यंदाही श्री सिद्धरामेश्वर यांचा अक्षतासोहळा वेळेवर बारा ते साडेबारा दरम्यान होईल. तसेच होमहवन विधीही वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न यंदा करणार असल्याची माहिती पहिल्या नंदीध्वजचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बाळवेस येथील हिरेहब्बू वाडय़ात श्री सिद्धरामेश्वर यांच्या धार्मिक विधीची माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिरेहब्बू बोलत होते. याप्रसंगी मनोज हिरेहब्बू, जगदीश विनोद, सागर हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, संतोष हिरेहब्बू, सुधीर थोबडे, सोमनाथ मेंगाणे, भीमाशंकर कुंभार, योगिराज कुंभार, मल्लिनाथ कुंभार, सुरेश माने, योगीनाथ कुरले, राजा वाले, भीमाशंकर म्हेञे आदी मानकरी उपस्थित होते. श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त सोलापूरसह परराज्यातून येणाऱया भाविकांची संख्या मोठी असते.
दुपारच्या सत्रात उन्हाची तीव्रता अधिक असते, उन्हात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी यंदाही अक्षतासोहळा वेळेवर होणार असून, साधारण बारा ते साडे बाराच्या दरम्यान नंदीध्वज संमत्ती कट्टय़ाजवळ येतील, त्यानंतर एक वाजेपर्यंत संपूर्ण विधी उरकण्यात येईल. तसेच यंदा होमहवन विधी गतवर्षीच्या तुलनेत एक तासभर अगोदर म्हणजेच रात्री नऊ वाजेपर्यंत विधी पूर्ण व्हावे, यासाठी सर्व नंदीध्वज मानकरी प्रयत्न करणार असल्याचे हिरेहब्बू यांनी सांगितले. त्याचबरोबर गतवर्षी यात्राकाळात सहाव्या व सातव्या मातंग समाजाचा नंदीध्वजाच्या मानपानसंबंधी भाविकांमध्ये गैरसमज करण्यात आले होते. मात्र यंदा याबाबत लेखी करार करून गैरसमज दूर करण्यात आले आहे. त्यामुळे सातही नंदीध्वज मानकऱयांमध्ये कोणताही धार्मिक वाद नाही आणि भविष्यातही वाद उद्भवणार नाही, अशाच पद्धतीने करार करण्यात आल्याची माहिती यांनी सांगितली.
विविध धार्मिक कार्यक्रम पुढील प्रमाणे ः
11 जानेवारी – रामचंद्र शेटे यांचे वारसदार ऍड. मिलिद थोबडे यांच्या घरात होमहवन व योगदंड पूजा आणि हिरेहब्बू यांची पाद्यपूजा कार्यक्रम.
12 जानेवारी – हिरेहब्बू वाडय़ात मानाच्या पहिली व दुसरी नंदीध्वजाला साज चढविण्याचा कार्यक्रम.
13 जानेवारी – 68 लिंगाचा तैलाभिषेकासाठी सकाळी आठ वाजता एक ते सात नंदीध्वज 68 लिंग दर्शनासाठी निघणार, कलेक्टर कचेरीजवळ सरकारतर्फे देशमुख व हिरेहब्बू यांना सरकारी आहेर.
14 जानेवारी – सातही नंदिध्वज सकाळी सात वाजता हिरेहब्बू वाडय़ातून देशमुख यांच्या हस्ते पूजनाने निघणार दुपारी साडेबारावाजेपर्यंत अक्षता सोहळ्यासाठी संमती कट्टय़ाजवळ पोहचणार आणि पुन्हा 68 लिंगाच्या दर्शनासाठी हे नंदीध्वज मार्गस्थ.
15 जानेवारी – सकाळी नऊ वाजता साताही नंदीध्वाजांची संमती कट्टय़ाजवळ येतात सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाला करमुटगी लावून योगदंड स्नान, सायंकाळी गंगा पूजनाचा धार्मिक विधी. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता हिरेहब्बू वाडय़ातून मिरवणुकीने नागफणी नंदीध्वज होममैदानावर येतील. होममैदानातील होमकुंडात कुंभार कन्येचे कन्यादान होमप्रदीपन झाल्यानंतर रात्री 10 वाजता पुन्हा हे नंदीध्वज मल्लिकार्जुन मंदिराकडे मार्गस्थ.
16 जानेवारी – सायंकाळी पाच वाजता हब्बू वाडय़ातून मिरवणुकीने नंदीध्वज होममैदानावर, तेथे शोभेचे दारूकाम आणि लेझर शो झाल्यानंतर पुन्हा नंदीध्वज व पालखी सोहळा श्री सिद्धरामेश्वर यांच्या गर्भ मंदिरास प्रदक्षिणा घालून मल्लिकर्जून मंदिराकडे मार्गस्थ.
17 जानेवारी – कप्पडकळीने श्री सिद्धरामेश्वर यात्रेची सांगता.