जलद गोलंदाज अली खान कोलकाता नाईट रायडर्स संघाशी करारबद्ध, अंतिम क्षणी इंग्लिशमन हॅरी गर्नीची जागा घेणार
वृत्तसंस्था / दुबई
आयपीएलच्या इतिहासात यंदा प्रथमच अमेरिकन क्रिकेटपटू खेळताना दिसणार आहे, तो म्हणजे जलद गोलंदाज अली खान! यंदाच्या हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सने त्याला करारबद्ध करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. इंग्लिश मध्यमगती गोलंदाज हॅरी गर्नी बाहेर पडल्यानंतर केकेआरने अलीला करारबद्ध केले. या कराराला आयपीएल कार्यकारिणीकडून औपचारिक मान्यता मिळणे बाकी आहे.
यापूर्वी इंग्लिश गोलंदाज गर्नीला खांद्यावर शस्त्रक्रिया करवून लागणार असल्याचे स्पष्ट झाले व यामुळे तो यंदाच्या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. त्या पार्श्वभूमीवर गर्नीची जागा भरुन काढण्यासाठी प्रयत्नात असलेल्या केकेआरने अमेरिकेच्या अली खानला करारबद्ध केले आहे.
अली खान यापूर्वी सीपीएल स्पर्धेत विजेतेपद संपादन करणाऱया ट्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाचा सदस्य होता. गुरुवारीच या संघाने पूर्ण स्पर्धेत अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवत थाटात जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अली खानने त्यातील 8 सामन्यात 8 बळी घेतले. शिवाय, 7.43 अशी इकॉनॉमी नोंदवली. मागील हंगामातही तो केकेआरच्या रडारवर होता. पण, त्यावेळी उभय घटकात करार होऊ शकला नव्हता.
अमेरिकेचा हा 29 वर्षीय अव्वल जलद गोलंदाज सर्वप्रथम 2018 ग्लोबल टी-20 कॅनडा स्पर्धेत प्रकाशझोतात आला. विंडीजचा स्टार अष्टपैलू डेव्हॉन ब्रेव्होने अलीमधील गुणवत्ता हेरली आणि त्याला कॅरेबियन प्रीमियर लीग अर्थात सीपीएल स्पर्धेत आणले. या हंगामात अली खानला सीपीएल ऑल स्टार टीममधूनही खेळण्याचा मान लाभला होता.
यंदा गयाना अमेझॉन वॉरियर्स संघातर्फे खेळताना अली खानने 12 सामन्यात 16 बळी घेतले. हंगामात सर्वात जलद बळी घेणाऱया गोलंदाजांच्या यादीत तो दुसरा ठरला होता. बेव्होने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर अली खान व ब्रेन्डॉन मॅक्युलम यांच्यासमवेतचा एक व्हीडिओ शेअर केला असून त्याखाली ‘नेक्स्ट स्टॉप दुबई’, असे म्हटले आहे.
राजस्थान रॉयल्सचा माजी गोलंदाज रस्टी थेरॉन हा सध्या अमेरिकन संघातर्फे खेळतो. मात्र, आयपीएलमध्ये खेळत असताना तो दक्षिण आफ्रिकन नागरिक होता. नंतर त्याने अमेरिकेत स्थिरस्थावर होणे पसंत केले. आयपीएलमधून बरखास्त डेक्कन चार्जर्सचे 2011 व किंग्स इलेव्हन पंजाबचे 2010 मध्ये त्याने प्रतिनिधीत्व केले.
अली खान सातत्याने प्रतितास 140 किलोमीटर्स वेगाने मारा करण्यात माहीर असून केकेआरला त्याच्याकडून या हंगामात बऱयाच अपेक्षा आहेत. अली खान यॉर्करसाठीही विशेष ओळखला जातो.
कॅरेबियन लीगनंतर पोलार्ड, रुदरफोर्डचे दुबईत आगमन
दुबई : कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत ट्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाला जेतेपद मिळवून दिल्यानंतर त्या संघातील स्टार खेळाडू केरॉन पोलार्ड शनिवारी येथे आयपीएल स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघात दाखल झाला. पोलार्डबरोबरच शेरफेन रुदरफोर्ड देखील येथे आला आहे. यापूर्वी सीपीएल स्पर्धेत पोलार्डनेच ट्रिनबॅगो संघाचे नेतृत्व साकारले होते. आता हाच धमाका आयपीएलमध्येही करण्याचा त्याचा निर्धार असेल.