प्रतिनिधी/ सातारा
दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येतो, यंदा सदर अभियान तब्बल एक महिना राबविण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना रस्ता सुरक्षिततेचे नियम माहित नाहीत त्यांना माहिती देण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी किंवा ज्यांना माहिती आहेत त्यांची उजळणी व्हावी या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येतो. यंदा या अभियानांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असुन मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी वेबिनार तसेच जनजागृती पर सायकल रॅली करण्यात येणार आहे. तसेच यंदा जिल्ह्य़ातील महामार्गावरील नेमके अपघात होणाऱया ‘ब्लॉक स्पॉट’ वर जाऊन तेथे अपघात होणाचे प्रमुख कारणे कोणती याची पहाणी करून तेथे जागृती करण्यात येणार आहे. अंतर्गत 52 सातारा व कराड मार्गावरील ब्लॉक स्पॉट वर ही मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सातारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी तरूण भारतशी बोलताना दिली.
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक शाखा, महामार्ग पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने 32 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन सोमवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा येथे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी रस्ता सुरक्षा अभियाना बाबत आले विचार मांडले.
याप्रसंगी जिल्हा पोलिस अधिक्षक अजय कुमार बन्सल, जिल्हा पोलिस परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संजय मुनगिलवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवासी वाहतुक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश गवळी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर चौधरी, आर.एस.पी.चे पुणे विभागीय समादेशक यशवंत गायकवाड आदी उपस्थित होते.