प्रतिनिधी/ कुडचडे
कुडचडेवासियांनी ज्या प्रकारे माझ्यावर विश्वास ठेवून आनंदाने काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. स्थानिक आमदारांनी लक्षात घ्यावे की, कुडचडेतील लोक त्यांना कंटाळले आहेत व जनता जागरूक झालेली आहे. कित्येक वर्षे कुडचडेवासियांवर लादलेली हुकूमशाही संपविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मला खात्री आहे की, यंदा कुडचडेत काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेलच, असा विश्वास काँग्रेस उमेदवार अमित पाटकर यांनी व्यक्त केला.
पाटकर यांच्या कार्यालयात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत नुकताच कुडचडे भंडारी समाजातील समिती सदस्यांसोबत 100 सदस्यांचा पक्षप्रवेश झाल्यावर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी कुडचडे काँग्रेस गटाध्यक्ष पुष्कल सावंत, सुधाकर नाईक, माजी सरपंच दयानंद नाईक, माजी नगरसेवक श्रीकांत गावकर, मार्केट असोसिएशनचे दिगंबर आडपईकर, धीरज प्रभुदेसाई, सुहास नाईक, महिला नेत्या रोशन गावकर, मंदा नाईक, इफियाना मास्कारेन्हस व इतर हजर होते.
कुडचडेत भाजपाचे अस्तित्वच नव्हते त्यावेळी आपण मोठय़ा जिद्दीने भाजपसाठी काम केले. पण पुढे आपल्यासारख्या कित्येक कार्यकर्त्यांना देखावा करणाऱयांनी बाजूला सारले. याच कारणास्तव आपण यंदा पाटकर यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. पाटकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारच, असे सुधाकर नाईक यांनी सांगितले. कुडचडेचे आमदार जो विकास केला म्हणून प्रत्येक वेळी सांगतात तो कोणाचा विकास आहे ते आपल्याला पुरेपूर माहीत आहे. कुडचडेसाठी काँग्रेसने एक चांगला उमेदवार दिलेला आहे. उमेदवार पाटकर यांचे आजोबा, वडील समाजसेवेत होते. पाटकर तेच कार्य पुढे नेत आहेत, असे दिगंबर आडपईकर म्हणाले.
काँग्रेसकडून चांगला उमेदवार
आपण आधी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. पण आप जी आश्वासने देतो त्यात काहीच तथ्य नाही. तेव्हा सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणाऱया काँग्रेस पक्षाला मतदान करावे, असे आवाहन दयानंद नाईक यांनी केले आहे. कुडचडेच्या आमदारांची दोन रूपे असून काकोडा येथील कचरा प्रकल्पाच्या विषयावरून आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. अशा आमदाराला यंदा घरी पाठविले पाहिजे. आपण काँग्रेस पक्षात येण्याचे कारण एकच की, यंदा काँग्रेसने एक चांगला विचार करणारा उमेदवार अमित पाटकर यांच्या रूपाने दिलेला आहे व त्यांचे कार्य बघितल्यास कुडचडेवासियांसमोर सुवर्णसंधी चालून आलेली आहे, असे श्रीकांत गावकर म्हणाले.
भाजप सोडताना अत्यंत दुःख होते. पण कुडचडेतील भंडारी समाजातील लोकांनी विचार करावा व व्यवस्थित निर्णय घ्यावा. 14 तारखेला काँग्रेसला मतदान करून अमित पाटकर यांना कुडचडेचे आमदार म्हणून निवडून द्यावे, असे आवाहन माजी युवा मोर्चा अध्यक्ष सुहास नाईक यांनी केले. काँग्रेस पक्षात प्रवेश करून आनंद झालेला आहे. कुडचडेत यंदा काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून येणार, असा विश्वास इफियाना मास्कारेन्हस यांनी व्यक्त केला. रोशन नाईक व मंदा नाईक यांनीही काँग्रेस पक्षाच्या कार्याची प्रशंसा केली व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.