सरकारी तिजोरीला फटका : कोटय़वधीचे नुकसान
प्रतिनिधी / पणजी
कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे यंदा राज्यात पर्यटन हंगाम कोरडा गेला. सरकारचा यामुळे मोठय़ा प्रमाणात महसूल बुडाला, तर किनारी भागातील व्यावसायिकांची साफ निराशा झाली. त्याचबरोबर प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले. यंदा देशी विदेशी पर्यटकाविना किनारे सुनसान झाले, तर आर्थिक उलाढाला पूर्णपणे थांबली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पर्यटन हंगाम अशाप्रकारे निराशाजनक ठरला.
जानेवारी ते मेपर्यंत राज्यात पर्यटन हंगाम बहारात येतो. या कालावधीत देशी, विदेशी पर्यटक गोव्यात गर्दी करतात. गोव्यातील बीच, पर्यटन स्थळे, प्रमुख शहरे आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिसून येते. या काळात हॉटेल व्यवसाय, शॅक व्यवसाय, किनारी भागातील व्यवसाय मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल करतात. 50 लाखापेक्षा जास्त पर्यटक गोव्याला भेट देतात. हॉटेल व्यवसायातून सरकारलाही मोठय़ा प्रमाणात महसूल प्राप्त होतो. यंदा मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसाय बुडाला. याचा मोठा परिणाम संबंधित व्यवसायावर झाला. लॉकडाऊन काळात मोठा परिणाम झाला तो टॅक्सी व्यवसायावर. हा व्यवसाय यंदाच्या हंगामात पूर्णपणे बुडाला.
राज्यातील तारांकित हॉटेल व्यवसायाला यंदा मोठा फटका बसला. पर्यटन हंगाम सुरू व्हायच्या वेळीच जगभरात कोरोनाने थैमान घातले. त्यामुळे विदेशी पर्यटक गोव्यात येणे पूर्णपणे बंद झाले. त्याचबरोबर देशी पर्यटकही गोव्यात येऊ शकले नाहीत. तारांकित हॉटेल्स व्यवसाय हा विदेशी पर्यटक व देशातील धनिक पर्यटकांवर अवलंबून असतो. देशातील दिल्ली, पंजाब, हरयाण, मुंबई या भागातून व्यावसायिक आपल्या कुटुंबासह येतात व तारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करतात. तर विदेशी पर्यटक मोठय़ा प्रमाणात ऑनलाईन बुकिंगद्वारे हॉटेल आरक्षित करतात. काही पर्यटक तब्बल महिना, दीड महिना एकेका हॉटेलमध्ये वास्तव्य करतात. यंदा मात्र कोरोनाच्या थैमानाने विदेशी पर्यटक गोव्या येऊ शकले नाहीत, तर लॉकडाऊनमुळे देशी पर्यटकही अडकून पडले. त्यामुळे हॉटेल व्यवसाय पूर्णपणे कोलमडला. कर्मचाऱयांना घरी बसविण्याची पाळी हॉटेल व्यावसायिकांवर आली.
टॅक्सी व्यवसाय पूर्णपणे बुडाला
पर्यटक टॅक्सी व्यवसाय राज्यात प्रचंड मोठा आहे. मोठय़ा प्रमाणात युवक या व्यवसायात आहेत. हॉटेलला जोडून हा व्यवसाय सुरू आहे. त्याचबरोबर पर्यटकांच्या भेटीवरही हा व्यवसाय अवलंबून आहे. यंदा पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवल्याने टॅक्सी व्यवसाय पूर्णपणे कोलमडला. लॉकडाऊनमुळे तर हा व्यवसाय आणखी अडचणीत आला. यंदाचा हंगाम पूर्णपणे कोरडा गेल्यामुळे टॅक्सी व्यावसायिकांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आर्थिक उलाढाल पूर्णपणे थांबली
पर्यटन हंगामात दरवर्षी विविध व्यवसायांच्या माध्यमातून कोटय़वधींची उलाढाल होते. यंदा मात्र पर्यटन हंगाम कोरडा गेल्याने व्यावसायिकांची घोर निराशा झाली. आर्थिक उलाढाल पूर्णपण थांबली. सरकारी तिजोरीला याचा मोठा फटका बसला. तर अन्य संबंधित व्यवसाय पूर्णपणे बुडाले. किनारी भागातील व्यवसाय पूर्णपणे पर्यटन हंगामावर अवलंबून असतात. यंदा मात्र कोरोनामुळे गोव्याच्या पर्यटनाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.