ऑनलाईन टीम / मुंबई :
दरवर्षी केरळमध्ये एक जूनला दाखल होणार मान्सून यंदा चार दिवस उशिराने म्हणजेच 5 जूनला दाखल होणार आहे अशी माहिती शुक्रवारी हवामान विभागाकडून देण्यात आली.
देशात मान्सूनचा हंगाम 1 जून ला सुरू होतो. आपल्या देशात केरळमध्ये पहिल्यांदा पाऊस दाखल होतो. मात्र, यंदा केरळमध्ये मान्सूनची सुरुवात नेहमीच्या तारखेपेक्षा थोडी उशिरा म्हणजेच चार दिवस विलंबाने सुरू होणार आहे.
केरळ नंतर तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेशमध्ये देखील मानसून दाखल होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या तळकोकणात दरवर्षी साधारण दहा जूनला मान्सून दाखल होतो. पण केरळमध्येच यंदा चार दिवस उशिराने दाखल होणार असल्याने राज्यात देखील विलंबाने म्हणजेच साधारण 11 जून च्या आसपास दाखल होईल.
तसेच परतीच्या पावसातही बदल होण्याची शक्यता आहे त्यानुसार, 15 ऑक्टोबरला मान्सून माघार घेईल, असे ही हवामान विभागाकडून सांगण्यात आले.