प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा जगप्रसिद्ध म्हैसूर दसरोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारने यासाठी 10 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, दसरोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आल्याने 2 कोटी 5 लाख 83 हजार खर्च झाले आहेत, अशी माहिती म्हैसूर जिल्हा पालकमंत्री एस. टी. सोमशेखर यांनी दिली.
म्हैसूर दसरोत्सवासाठी 23 विभागांसाठी जिल्हा प्रशासनाने पैसे खर्च केले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या कलाकारांसाठी 44 लाख, दसरा हत्तींच्या व्यवस्थापनासाठी 35 लाख, दोन व्यासपीठांसाठी 41 आणि राजघराण्याला 40 लाख रुपये असा एकूण 2 कोटी 5 लाखांवर खर्च करण्यात आला आहे. याचबरोबर श्रीरंगपट्टण येथील दसऱयासाठी 50 लाख आणि चामराजनगर दसऱयासाठी 36 लाख रुपये खर्च झाला आहे. तसेच अतिरिक्त खर्चावर यंदा आळा घालण्यात आला असून जुन्या परंपरेनुसार सर्व रक्कम खर्च करण्यात आला आहे. त्यानुसार उर्वरित रक्कम कोठे खर्च करावी, याबाबत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याशी चर्चा करणार आहे, असे त्यांनी सांगितले.