पहिली कसोटी, चौथा दिवस : चहापानाअखेर 3 बाद 168 धावांपर्यंत मजल
साऊदम्प्टन / वृत्तसंस्था
येथील पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी यजमान इंग्लंड संघाने चहापानाअखेर 3 बाद 168 अशी मजबूत सुरुवात करत पाहुण्या विंडीज संघावर सामन्यात प्रथमच दडपण निर्माण केले. प्रेक्षकांशिवाय खेळवल्या जात असलेल्या कोव्हिड-19 नंतरच्या या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटीत इंग्लंडचा संघ चहापानाअखेर 54 धावांनी आघाडीवर होता.
इंग्लंडचा पहिला डाव माफक 204 धावांमध्ये गुंडाळला गेल्यानंतर विंडीजने सर्वबाद 318 धावा जमवत 114 धावांची दमदार आघाडी जरुर प्राप्त केली. पण, इंग्लंडने दुसऱया डावात चहापानाअखेर संघर्षमय खेळ साकारत सामन्यात जान भरली आहे.
इंग्लंडच्या दुसऱया डावात रोरी बर्न्स व सिबली या जोडीने 36.1 षटकात 72 धावांची दमदार सलामी दिली. यापैकी रोरी बर्न्सने 104 चेंडूत 5 चौकारांसह 42 धावा फटकावल्या तर सिबलीने 164 चेंडूत 4 चौकारांसह शानदार अर्धशतक झळकावले. तिसऱया स्थानावरील जो डेनली हा चेसच्या गोलंदाजीवर होल्डरकडे झेल देत बाद झाला. त्याच्या 70 चेंडूत 29 धावांच्या खेळीत 3 चौकारांचा समावेश राहिला.
चहापानासाठी खेळ थांबवण्यात आला त्यावेळी क्रॉली (68 चेंडूत 3 चौकारांसह 38) व बेन स्टोक्स (15 चेंडूत नाबाद 0) क्रीझवर होते. विंडीज संघातर्फे रोस्टन चेसने 45 धावात 2 तर शेनॉन गॅब्रिएलने 34 धावात 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव : सर्वबाद 204. विंडीज पहिला डाव : सर्वबाद 318. इंग्लंड दुसरा डाव 3-168 (सिबली 164 चेंडूत 4 चौकारांसह 50, रोरी बर्न्स 104 चेंडूत 5 चौकारांसह 42, क्रॉली 68 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 38, बेन स्टोक्स 15 चेंडूत नाबाद 0. अवांतर 9. रोस्टन चेस 19 षटकात 2-45, शेनॉन गॅब्रिएल 12 षटकात 1-34).
अष्टपैलू बेन स्टोक्सचा दुहेरी पराक्रम
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 4 हजार धावा व 150 बळी नोंदवणाऱया अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत इंग्लंडचा हंगामी कर्णधार बेन स्टोक्सने दुसरे स्थान प्राप्त केले. तिसऱया दिवसाच्या खेळात अल्झारी जोसेफला बाद केले, त्यावेळी त्याने हा टप्पा गाठला. 4 हजार धावा व 150 पेक्षा अधिक बळी घेणाऱया अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत इयान बोथमसह अन्य चार खेळाडूंचा समावेश आहे. स्टोक्सने डावातील 14 षटकांच्या खेळात 49 धावात 4 बळी, असे पृथक्करण नोंदवले. 29 वर्षीय स्टोक्सने 64 व्या सामन्यात हा दुहेरी पराक्रम साधला. विंडीजचे गॅरी सोबर्स या यादीत अव्वलस्थानी असून त्यांनी 63 सामन्यात हा माईलस्टोन सर केला होता. सोबर्स, स्टोक्स यांच्याशिवाय दक्षिण आफ्रिकन जॅक कॅलिस, कपिल देव, माजी किवीज कर्णधार डॅनिएल व्हेटोरी यांचाही या यादीत समावेश आहे.