वृत्तसंस्था / मँचेस्टर :
येथील दुसऱया कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने अखेरचे वृत्त हाती आले, त्यावेळी 40 षटकात 3 बाद 96 अशी सावध सुरुवात केली होती. सलामीवीर डॉम सिबली 131 चेंडूत 42 तर बेन स्टोक्स 25 चेंडूत 8 धावांवर खेळत होते. 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 फरकाने आघाडीवर असलेल्या विंडीज संघाने या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर यजमान संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण केले.
प्रारंभी, रोरी बर्न्स (35 चेंडूत 15) व डॉम सिबली (नाबाद 42) यांना 13.2 षटकात फक्त 29 धावांची सलामी देता आली. मँचेस्टरमध्ये ढगाळ हवामान असून ओलसर खेळपट्टीमुळे दिवसाच्या खेळाला उशिराने सुरुवात करण्यात आली. पुढेही परिस्थितीत फारशी सुधारणा झाली नसल्याने फलंदाजांना सावध पवित्र्यावर भर देणे भाग होते. फिरकीपटू रोस्टन चेसने 5 षटकात 13 धावात 2 बळी घेतले होते.
पहिल्या दिवशी त्याने सलामीवीर रोरी बर्न्सला पायचीत केले तर तिसऱया स्थानावरील क्रॉलीला (0) पहिल्याच चेंडूवर होल्डरकरवी झेलबाद केले. जोसेफने ब्रिटीश कर्णधार रुटला (23) तंबूचा रस्ता दाखवला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव : 40 षटकात 3 बाद 96 (डॉम सिबली 131 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 42, जो रुट 49 चेंडूत 23, रोरी बर्न्स 35 चेंडूत 15. रोस्टन चेस 13 धावात 2 बळी, अल्झारी जोसेफ 1-17).
शिस्तभंग केल्याने आर्चरची सामन्यातून हकालपट्टी
इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरला शिस्तभंग केल्याने दुसऱया कसोटी सामन्यातून वगळले गेले असून या पाच दिवसांच्या कालावधीत त्याला विलग रहावे लागेल, शिवाय त्याची दोनवेळा कोव्हिड-19 चाचणी घेतली जाणार आहे. पहिली कसोटी पूर्ण झाल्यानंतर परवानगी नसताना देखील आर्चर आपल्या घरी गेला होता. त्यामुळे, त्याच्यावर ही कारवाई केली गेली. शिस्तभंग केल्याबाबत जोफ्रा आर्चरने दिलगिरी व्यक्त केली आहे.
‘मी या चुकीच्या वर्तणुकीमुळे फक्त स्वतःलाच नव्हे तर पूर्ण संघाला आणि व्यवस्थापनाला धोक्यात घातले. मला माझी चूक मान्य आहे आणि याबाबत मी आपल्या सर्वांची खुल्या दिलाने माफी मागतो’, असे आर्चरने नमूद केले. बीबीसी टीएमएस ट्वीटर हँडलवरील माहितीप्रमाणे जोफ्रा आर्चर सोमवारी आपल्या घरी गेला होता. बार्बाडोसचा जन्म असलेल्या या 25 वर्षीय जलद गोलंदाजाने आतापर्यंत इंग्लिश संघातर्फे 8 कसोटी, 14 वनडे 1 टी-20 सामना खेळला आहे. या छोटय़ा कालावधीत त्याच्या खात्यावर 58 आंतरराष्ट्रीय बळी आहेत.