तिसऱया दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची दुसऱया डावात 1 बाद 45 धावांपर्यंत मजल, इंग्लंडचा संघ पहिल्या डावात सर्वबाद 236
ऍडलेड / वृत्तसंस्था
यजमान ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेतील दुसऱया कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध 282 धावांची भरभक्कम आघाडी प्राप्त केली. शनिवारी तिसऱया दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 9 बाद 473 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव 236 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन न देता 17 षटकात 1 बाद 45 धावांपर्यंत मजल मारली आणि एकत्रित आघाडी 282 धावांवर नेली. तिसऱया दिवसअखेर मार्कस हॅरिस 21 तर मायकल नेसर 2 धावांवर खेळत होते.
दिवसातील शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पहिला डाव 236 धावांवर गुंडाळला. इंग्लंडचे शेवटचे 8 फलंदाज अवघ्या 86 धावांमध्ये गारद झाले. डेव्हिड मलान व जो रुट यांनी अनुक्रमे 80 व 62 धावांचे योगदान दिले. मात्र, ते दोघे बाद झाल्यानंतर इंग्लिश फलंदाजी लाईनअपने सातत्याने पडझड अनुभवली. बेन स्टोक्स व ख्रिस वोक्स हेच दोघे नंतर दुहेरी धावसंख्या गाठू शकले.
यजमान संघातर्फे मिशेल स्टार्कने 4 बळी घेतले तर फिरकीपटू नॅथन लियॉनने 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. कॅमेरुन ग्रीनने 2 बळी घेतले. नेसरने देखील एक गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाने शेवटच्या सत्रात 17 षटके फलंदाजी करताना 45 धावा केल्या. मात्र, यासाठी वॉर्नरचा बळी त्यांना गमवावा लागला. वॉर्नर समन्वयाच्या अभावामुळे धावचीत होत तंबूत परतला. स्टुअर्ट ब्रॉडचे अप्रतिम क्षेत्ररक्षण निर्णायक ठरले.
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः 9 बाद 473 वर घोषित.
इंग्लंड पहिला डाव ः हसीब हमीद झे. स्टार्क, गो. नेसर 6 (21 चेंडू), रोरी बर्न्स झे. स्मिथ, गो. स्टार्क 4 (3 चेंडूत 1 चौकार), डेव्हिड मलान झे. स्मिथ, गो. स्टार्क 80 (157 चेंडूत 10 चौकार), जो रुट झे. स्मिथ, गो. ग्रीन 62 (116 चेंडूत 7 चौकार), बेन स्टोक्स त्रि. गो. ग्रीन 34 (98 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), ऑलि पोप झे. लाबुशाने, गो. लियॉन 5 (19 चेंडूत 1 चौकार), जोस बटलर झे. वॉर्नर, गो. स्टार्क 0 (15 चेंडू), ख्रिस वोक्स त्रि. गो. लियॉन 24 (40 चेंडूत 5 चौकार), ऑलि रॉबिन्सन पायचीत गो. लियॉन 0 (7 चेंडू), स्टुअर्ट ब्रॉड झे. हेड, गो. स्टार्क 9 (17 चेंडूत 1 षटकार), जेम्स अँडरसन नाबाद 5 (13 चेंडूत 1 चौकार). अवांतर 7. एकूण 84.1 षटकात सर्वबाद 236.
गडी बाद होण्याचा क्रम
1-7 (रोरी बर्न्स, 2.1), 2-12 (हमीद, 6.2), 3-150 (रुट, 45.4), 4-157 (मलान, 51.5), 5-164 (ऑलि पोप, 56.6), 6-169 (बटलर, 61.5), 7-202 (वोक्स, 74.5), 8-204 (रॉबिन्सन, 76.4), 9-220 (स्टोक्स, 79.3), 10-236 (ब्रॉड, 84.1).
गोलंदाजी
मिशेल स्टार्क 16.1-6-37-4, झाय रिचर्डसन 19-4-78-0, मायकल नेसर 11-0-33-1, लियॉन 28-11-58-3, कॅमेरुन ग्रीन 10-3-24-2.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव ः डेव्हिड वॉर्नर धावचीत (ब्रॉड-बटलर) 13 (38 चेंडूत 1 चौकार), मार्कस हॅरिस खेळत आहे 21 (59 चेंडूत 3 चौकार), मायकल नेसर खेळत आहे 2 (6 चेंडू). अवांतर 9. एकूण 17 षटकात 1 बाद 45.
गडी बाद होण्याचा क्रम
1-41 (वॉर्नर, 13.6).
गोलंदाजी
जेम्स अँडरसन 4-3-2-0, स्टुअर्ट ब्रॉड 3-0-9-0, ऑलि रॉबिन्सन 4-1-12-0, ख्रिस वोक्स 4-2-13-0, जो रुट 2-1-1-0.
स्टार्क डे-नाईट कसोटीत 50 बळी घेणारा पहिला गोलंदाज
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा गोलंदाज मिशेल स्टार्क दिवस-रात्र कसोटीत 50 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला. स्टार्कने प्रारंभी रोरी बर्न्सला बाद करत ब्रेकथ्रू मिळवला. नंतर त्याला डेव्हिड मलानची प्राईज विकेट मिळाली. यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरला बाद करत त्याने तिसरा बळी नोंदवला. पुढे स्टुअर्ट ब्रॉड हा डावातील शेवटचा फलंदाज बाद करत त्याने 16.1 षटकात 37 धावात 4 बळी, असे भेदक पृथक्करण नोंदवले.
कॅलेंडर वर्षात 1600 कसोटी धावांचा रुटचा विक्रम
एकाच कॅलेंडर वर्षात 1600 पेक्षा अधिक कसोटी धावा जमवणाऱया फलंदाजांमध्ये जो रुट दाखल झाला. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, मायकल क्लार्क यांनी असे पराक्रम गाजवले आहेत. या वर्षभरात रुटने 6 शतके, 64 ची सरासरी व सर्वोच्च 228 धावांसह हा माईलस्टोन सर केला. हाच धडाका कायम राखल्यास त्याला सर व्हीवियन रिचर्ड्सचा 1700 धावांचा तर मोहम्मद युसूफचा 2006 मधील 1788 धावांचा कॅलेंडर वर्षातील विक्रमही मोडण्याची संधी असेल.