यजमानांचा 7 गडी राखून सहज विजय, रिषभ पंतची 85 धावांची खेळी निष्फळ
पार्ल / वृत्तसंस्था
जे. मलान (108 चेंडूत 91) व क्विन्टॉन डी कॉक (66 चेंडूत 78) यांच्या 22 षटकातील 132 धावांच्या सलामी भागीदारीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने भारताचा दुसऱया वनडे सामन्यातही 7 गडी राखून धुव्वा उडवला आणि 3 सामन्यांच्या या मालिकेत 2-0 असा एकतर्फी विजय निश्चित केला. प्रारंभी, रिषभ पंतच्या 71 चेंडूतील 85 धावांच्या धुवांधार खेळीमुळे भारताने निर्धारित 50 षटकात 6 बाद 287 धावांची आतषबाजी केली असली तरी प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने तोडीस तोड प्रत्युत्तर देत सहजसोपा विजय साकारत भारतीय संघाला आणखी एक धक्का दिला.
विजयासाठी 288 धावांच्या कडव्या आव्हानाचा पाठलाग करताना मलान व डी कॉक यांनी आक्रमक सुरुवात केली आणि इथेच आफ्रिकन विजयाचा पाया रचला गेला. तुलनेने डी कॉक अधिक आक्रमक राहिला आणि त्याने 118.18 च्या स्ट्राईक रेटने 66 चेंडूत 7 चौकार व 3 षटकारांसह भारतीय गोलंदाजांची चौफेर धुलाई केली.
मलानने डी कॉकला समयोचित साथ देत 108 चेंडूत 91 धावा फटकावताना 8 चौकार व 1 षटकार वसूल केले. तेम्बा बवूमाला (36 चेंडूत 35) चहलने परतीचा झेल टिपत बाद केले असले तरी त्यानेही यजमान संघ विजयाच्या ट्रकवर कायम असेल, याची तजवीज केली. आवश्यक धावसरासरी बरीच आवाक्यात आली असल्याने मॅरक्रम (41 चेंडूत नाबाद 37) व डय़ुसेन (38 चेंडूत नाबाद 37) यांनी फारसे धोके न पत्करता स्ट्राईक रोटेट करत खराब चेंडूंची प्रतीक्षा करण्यावर भर दिला. या जोडीने 48.1 षटकात संघाच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले. उभय संघातील तिसरी व शेवटची वनडे उद्या (रविवार दि. 23) होईल.
रिषभ पंतची उत्तम फटकेबाजी
प्रारंभी, रिषभ पंतच्या 71 चेंडूतील 85 धावांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळीमुळे भारताने यजमानांसमोर 288 धावांचे तुलनेने कडवे आव्हान ठेवले. पंत व कर्णधार केएल राहुल (79 चेंडूत 55) यांनी 19 षटकापेक्षा कमी खेळात 115 धावांची भागीदारी साकारली. वास्तविक, या दोघांनीही फिरकीपटूंसह संथगती-मध्यमगती गोलंदाजांवर उत्तम वर्चस्व गाजवले. पण, नंतर ठरावीक अंतराने गडी बाद होण्याचा सिलसिला सुरु झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांना भारताची धावसंख्या आणखी आवाक्याबाहेर जाणार नाही, याची खातरजमा करुन घेता आली. श्रेयस (14 चेंडूत 11) व वेंकटेश (33 चेंडूत 22) या दोघा अय्यरना झगडावे लागले, ते मात्र चिंतेचे ठरले. चेंडू सहजपणे बॅटवर येत नसल्याने त्यांना सहज धावा जमवणे शक्य झाले नाही.
रिषभ पंतने वनडे क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक झळकावले असते तर भारताला आणखी 20 धावा जमवणे सहज शक्य झाले असते. शार्दुल ठाकुरने पुन्हा एकदा आपल्या बॅटचा जलवा दाखवत 38 चेंडूत नाबाद 40 धावांचे योगदान दिले. रविचंद्रन अश्विनने देखील 24 चेंडूत नाबाद 25 धावा जमवल्या.
जवळपास 30 षटके क्रीझवर राहिलेल्या केएल राहुलने 79 चेंडूत 4 चौकारांसह 55 धावांचे योगदान दिले. मात्र, धावगती उंचावण्यात त्याला अजिबात यश आले नाही. त्या तुलनेत रिषभ पंतने जवळपास प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडण्यावर भर देत आफ्रिकन संघावर दडपण आणले. केशव महाराज (9-0-52-1) व डावखुरा मनगटी फिरकीपटू तबरेझ शमसी (9-0-57-2) यांचे पृथक्करण पंतने बिघडवले. पंतने काऊ कॉर्नरच्या दिशेने स्लॉग स्वीप व स्क्वेअर ऑफ द विकेटकडे दमदार स्वीप करत जोरदार हल्ला चढवला.
त्यापूर्वी, नवोदित मध्यमगती गोलंदाज सिसान्दाने (8-0-64-1) त्याच्या दुसऱया स्लीपमध्ये केएल राहुलला फ्लिकचे निमंत्रण देत तंबूचा रस्ता दाखवला. पंतचा शॉर्ट मिडविकेटवर तैनात रॅस्सी व्हान डेर डय़ुसेनने झेल टिपला. सिसान्दा व फेहलुकवायो (8-0-44-1) यांनी 33 ते 43 व्या षटकादरम्यान अतिशय काटेकोर मारा साकारला. त्यांच्या गोलंदाजीत स्लोअर वन व कटर्सचा उत्तम मिलाफ होता. प्रारंभी, शिखर धवनने (38 चेंडूत 29) सिसान्दाच्या गोलंदाजीवर पहिल्या पॉवर प्लेमध्ये उत्तम आक्रमण चढवले. धवन व राहुल यांनी 63 धावांची सलामी दिली. एडन मॅरक्रमने ही जोडी फोडली. धवनने स्लॉग स्वीपचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डीप मिडविकेटकडे सोपा झेल दिला. विराटला महाराजने शून्यावरच बाद करणे अधिक धक्का देऊन गेले. त्यानंतर पंत व राहुल यांनी डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता.
धावफलक
भारत ः केएल राहुल झे. डय़ुसेन, गो. सिसान्दा 55 (79 चेंडूत 4 चौकार), शिखर धवन झे. सिसान्दा, गो. मॅरक्रम 29 (38 चेंडूत 5 चौकार), विराट कोहली झे. बवुमा, गो. महाराज 0 (5 चेंडू), रिषभ पंत झे. मॅरक्रम, गो. शमसी 85 (71 चेंडूत 10 चौकार, 2 षटकार), श्रेयस अय्यर पायचीत गो. शमसी 11 (14 चेंडू), वेंकटेश अय्यर यष्टीचीत डी कॉक, गो. फेहलुकवायो 22 (33 चेंडूत 1 षटकार), शार्दुल ठाकुर नाबाद 40 (38 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), रविचंद्रन अश्विन नाबाद 25 (24 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार). अवांतर 20. एकूण 50 षटकात 6 बाद 287.
गडी बाद होण्याचा क्रम
1-63 (धवन, 11.4), 2-64 (विराट, 12.4), 3-179 (केएल, 31.1), 4-183 (रिषभ, 32.3), 5-207 (श्रेयस, 36.5), 6-239 (वेंकटेश, 43.5).
गोलंदाजी
लुंगी एन्गिडी 8-0-35-0, सिसान्दा 8-0-64-1, मॅरक्रम 8-0-34-1, केशव महाराज 9-0-52-1, फेहलुकवायो 8-0-44-1, तबरेझ शमसी 9-0-57-2.
दक्षिण आफ्रिका ः मलान त्रि. गो. बुमराह 91 (108 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), क्विन्टॉन डी कॉक पायचीत गो. शार्दुल 78 (66 चेंडूत 7 चौकार, 3 षटकार), तेम्बा बवूमा झे. व गो. चहल 35 (36 चेंडूत 3 चौकार), एडन मॅरक्रम नाबाद 37 (41 चेंडूत 4 चौकार), डय़ुसेन नाबाद 37 (38 चेंडूत 2 चौकार). अवांतर 10. एकूण 48.1 षटकात 3 बाद 288.
गडी बाद होण्याचा क्रम
1-132 (डी कॉक, 21.6), 2-212 (मलान, 34.4), 3-214 (बवूमा, 35.4)
गोलंदाजी
बुमराह 10-0-37-1, भुवनेश्वर 8-0-67-0, अश्विन 10-1-68-0, चहल 10-0-47-1, शार्दुल 5-0-35-1, वेंकटेश अय्यर 5-0-28-0, श्रेयस अय्यर 0.1-0-1-0.