वृत्तसंस्था/ कराची
दुसऱया क्रिकेट कसोटीतील सोमवारी खेळाच्या तिसऱया दिवशी ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर पाक संघाची पहिल्या डावात घसरगुंडी झाली. ऑस्ट्रेलियाने 489 धावांची आघाडी घेतली असून पाकचा संघ मोठय़ा पराभवाच्या छायेत वावरत आहे.
ऑस्ट्रेलियाने 8 बाद 505 या धावसंख्येवरून सोमवारी खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांनी 189 षटकांत 9 बाद 556 धावांवर डावाची घोषणा केली. मिचेल स्टार्क नवव्या गडय़ाच्या रूपात बाद झाल्यानंतर कर्णधार कमिन्स आणि स्वेपसन यांनी शेवटच्या गडय़ासाठी अभेद्य 51 धावांची भागिदारी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने डावाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियातर्फे उस्मान ख्वाजाने 160, वॉर्नरने 36, स्मिथने 72, लियॉनने 38, हेडने 28, कॅमेरून ग्रीनने 93, स्टार्कने 28, कमिन्सने नाबाद 34 धावा जमविल्या. कमिन्सने 36 चेंडूत 3 षटकार आणि दोन चौकार मारले. पाकतर्फे अश्रफ आणि साजीद खान यांनी प्रत्येकी दोन तर शाहीन आफ्रिदी, हसन अली, नौमन अली आणि बाबर आझम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाच्या अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर पाकचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. त्यांचा पहिला डाव 53 षटकांत 148 धावांत आटोपला. पाकच्या पहिल्या डावात कर्णधार बाबर आझमने 3 चौकारांसह 36, शफीकने 1 चौकारांसह 13, इमाम उल हकने 3 चौकारांसह 20, अझहर अलीने 1 षटकारांसह 14, नौमन अलीने 4 चौकारांसह नाबाद 20 तर शाहीन आफ्रिदीने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 19 धावा जमविल्या. पाकच्या एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्कने 29 धावांत 3, स्वेपसनने 32 धावांत 2, कमिन्स, लियॉन, ग्रीन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाने उपलब्ध असूनही पाकला फॉलोऑन दिला नाही आणि त्यांनी आपल्या दुसऱया डावाला प्रारंभ केला.
ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर दुसऱया डावात 17 षटकांत 1 बाद 81 धावा जमवित पाकवर 489 धावांची आघाडी मिळविली. वॉर्नर हसन अलीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 7 धावा जमविल्या. उस्मान ख्वाँजा 3 चौकारांसह 35 तर लाबुसिंघे 1 षटकार अणि 5 चौकारांसह 37 धावावर खेळत आहे. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी असून ऑस्ट्रेलियाचा संघ मोठय़ा विजयाकडे वाटचाल करीत आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प. डाव- 189 षटकांत 9 बाद 556 डाव घोषित (उस्मान ख्वाजा 160, कॅरे 93, स्मिथ 72, वॉर्नर 36, लियॉन 38, हेड 23, ग्रीन 28, स्टार्क 28, कमिन्स नाबाद 34, स्वेपसन नाबाद 15, अश्रफ 2-55, साजीद खान 2-167, शाहीन आफ्रिदी, हसन अली, नौमन अली, बाबर आझम प्रत्येकी एक बळी), पाक प. डाव- 53 षटकांत सर्वबाद 148 (शफीक 13, इमाम उल हक 20, अझहर अली 14, बाबर आझम 36, नौमन अली नाबाद 20, शाहीन आफ्रिदी 19, स्टार्क 3-29, स्वेपसन 2-32, कमिन्स 1-39, लियॉन 1-13, ग्रीन 1-23), ऑस्ट्रेलिया दु. डाव- 17 षटकांत 1 बाद 81 (उस्मान ख्वाजा खेळत आहे 35, लाबुशाने खेळत आहे 37, वॉर्नर 7, हसन अली 1-14).