विंडीजला 63 धावांनी नमवले, 3 सामन्यांच्या मालिकेत आघाडी
कराची / वृत्तसंस्था
मोहम्मद रिझवान (52 चेंडूत 78), हैदर अली (68) यांची झंझावाती फटकेबाजी व मोहम्मद वासिम (4-40), शदाब (3-17) यांच्या भेदक माऱयामुळे पाकिस्तानने वेस्ट इंडीजला पहिल्या टी-20 सामन्यात 63 धावांनी पराभूत केले व 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पाकिस्तानने या लढतीत प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 बाद 200 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात विंडीजचा डाव 19 षटकात 137 धावांमध्येच आटोपला.
मोहम्मद हाफीज व शोएब मलिक यांच्यासारख्या मध्यफळीतील दिग्गज फलंदाजांच्या गैरहजेरीत त्यांची उणीव रिझवान व हैदर अली या फलंदाजांनी अजिबात भासू दिली नाही. रिझवानने 52 चेंडूत 78 धावांचा झंझावात साकारला तर हैदर अलीने 39 चेंडूत 68 धावांची आतषबाजी केली. या उभयतांच्या चौफेर फटकेबाजीमुळे पाकिस्तानने 20 षटकात 6 बाद 200 धावांचा डोंगर उभा केला.
विजयासाठी 201 धावांचे खडतर आव्हान असताना विंडीजचा संघ एकदाही विजयाच्या आसपास देखील दिसून आला नाही. शाय होपने 26 चेंडूत सर्वाधिक 31 तर पॉवेलने 23 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानतर्फे मोहम्मद वासिम व शदाब खान यांनी विंडीजच्या डावाला मोठे खिंडार पाडले. वासिमने 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना 40 धावात 4 तर शदाब खानने 4 षटकात 17 धावात 3 बळी घेतले. या विजयासह पाकिस्तानने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. हैदर अली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान ः 20 षटकात 6 बाद 200 (मोहम्मद रिझवान 52 चेंडूत 10 चौकारांसह 78, हैदर अली 39 चेंडूत 6 चौकार, 4 षटकारांसह 68, मोहम्मद नवाझ 10 चेंडूत नाबाद 30. रोमारिओ शेफर्ड 4 षटकात 2-43, अकिल होसेन, डॉमिनिक ड्रेक्स, ओडिन स्मिथ प्रत्येकी 1 बळी).
वेस्ट इंडीज ः 19 षटकात सर्वबाद 137. (शाय होप 26 चेंडूत 4 चौकारांसह 31, रोव्हमन पॉवेल 15 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारांसह 23, रोमारिओ शेफर्ड 16 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 21, ओडियन स्मिथ 16 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 24. मोहम्मद वासिम 4 षटकात 4-40 शदाब खान 4 षटकात 3-17, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद नवाझ, हॅरिस रौफ प्रत्येकी 1 बळी).