वार्ताहर / यड्राव
यड्राव येथील सांगली मार्गावर असणाऱ्या बालाजी वेअर हाऊस समोर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे .यामध्ये दोन्ही ट्रक चालक जखमी झाल्याने त्यांना हातकणंगले येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. इचलकरंजी जयसिंगपूर मार्गावरच हा अपघात झाल्याने अपघातानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
सकाळी आठच्या सुमारास एम एच १० झेड १६२९ हा ट्रक जवाहर साखर कारखान्याकडे साखर भरण्यासाठी चालक यासिन आवटी (रा. सांगली) हा जात होता. याच वेळी जयसिंगपूर कडे जाणारा एम एच ०९बीए ६६५१ हा ट्रक नामदेव शिवाजी वाईंगडे( रा.आर के नगर इचलकरंजी)हे भरघावपणे घेऊन जात असताना त्यांनी समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या धडकेत यासीन आवटी यांच्या पायाला जबर मार बसला आहे तर नामदेव वाईंगडे हे पण जखमी झाले असल्याने या दोघांना उपचारासाठी हातकणंगले येथील सरकारी दवाखान्यात पोलीस पाटील जगदीश सपकाळ यांच्या सह ग्रामस्थांनी दाखल केले आहे.
या धडकेत दोन्ही ट्रकचे ड्रायव्हर केबिंन्स पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत .इचलकरंजी कडे जाणारा ट्रक नंबर 16 29 च्या डिझेलची टाकी पूर्णपणे फुटली असल्याने त्याठिकाणी डिझेल सांडले होते. दोन्ही ट्रकचे उध्वस्त झालेले साहित्य रस्त्यावर पडल्याने रस्त्यावर रहदारीला अडथळा निर्माण झाला होता .या घटनेची माहिती शहापूर पोलिसांना मिळाल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश खराडे शशिकांत ढोणे यांनी घटनास्थळी भेट देऊन रस्त्यावर अडथळा निर्माण करणारा अपघातग्रस्त ट्रक क्रेन ने बाजूला करून रस्ता वाहतुकीस खुला केला.