इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरात हनी ट्रॅपचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच यड्राव (ता. शिरोळ) बेघर वसाहतीमधील एका युवकाने हनी ट्रॅपला कंटाळून राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली आहे. सागर बाबूराव रणनवरे ( वय २८) असे त्याचे नाव आहे. त्याने यापूर्वी चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यांची नोंद शहापूर पोलिसांत झाली आहे.
यड्राव बेघर वसाहतीमध्ये सागर हा आपल्या कुटुंबासमवेत राहतो. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पोलिसांना मृत सागरचा मोबाईल फोन आढळून आला. त्यामध्ये अश्लील व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास आल्याने पोलिसांनी मोबाईल जप्त केला असून, मृत सागरने हनी ट्रॅपला कंटाळून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. हनी ट्रॅपमुळे महिन्याभरापूर्वी इचलकरंजीत एकाने आत्महत्या केली होती.