पाणीपुरवठ्याच्या नवीन पाइपलाईनचे काम पूर्ण
यमगे/प्रतिनिधी :
यमगे(ता. कागल)येथे दूषित पाणीपुरवठ्यामूळे गॅस्ट्रोच्या साथीच्या रूग्णांची संख्या 467 झाली आहे. चौथ्या दिवशी गॅस्ट्रोचे 40 रुग्ण आढळून आले आहेत. गावात पिण्यासाठी पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचे 24 नमूने तपासण्यासाठी कोल्हापूर येथे जिल्हा तपासणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यापैकी 23 पाण्याचे नमूने दूषित असल्याचा अहवाल आज प्राप्त झाला. दरम्यान गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सरपिराजीराव जलाशय ते गाव विहिरीपर्यंत टाकली जाणारी नवीन पाइपलाईन बसविण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण झाल्याचे सरपंच मनोरमा भोसले यांनी सांगितले. पूर्वी या विहिरीत एका पाटाद्वारे पाणी आणले जात असे.
यमगे येथे मंगळवारपासून गॅस्ट्रोची लागण सुरु झाली आहे गुरुवारी रात्रीपर्यंत 427 गॅस्ट्रो रुग्णांची नोंद होती. शुक्रवारी परत 40 रुग्णांना साथीची लागण झाली. त्यांच्यावर येथील प्राथमिक शाळेत सुरू केलेल्या आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. गॅस्ट्रोच्या 24 गंभीर रुग्णांना मुरगूड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यापैकी 20 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
गावाला पिण्याचा पाणीपुरवठा होतो त्या पाण्याचे 24 नमूने जिल्हा प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्याचा अहवाल मिळाला असून 24 पैकी 23 नमूने दोषी असल्याचे या अहवालानुसार समजते. त्यामूळे हा पाणीपुरवठा सध्या बंद करण्यात आला आहे . गावातील विंधन विहीरीद्वारे व वॉटर प्युरीफायरचे पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. तरीही ग्रामस्थांनी पाणी उकळूनच प्यावे असे आवाहन करण्यात आल्याचे पिंपळगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ .सुरेश कदम यांनी सांगितले . यमगे गॅस्ट्रो साथीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती अमरिश घाटगे व बांधकाम-आरोग्य समितीचे सभापती हंबीरराव पाटील यांनी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला .