वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
यमनापूरनजीकच्या सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला मटण व चिकन खरेदी करणाऱयांच्या दुचाकी व चारचाकी वाहन पार्किंगमुळे या रस्त्यावर दररोज सकाळच्यावेळी वाहतुकीस अडचण येत आहे. त्यामुळे कोरोना महामारीला रोखण्यासाठी शासनाने घातलेल्या सामाजिक अंतराचा फज्जा उडत आहे.
सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला मटण व चिकनची अनेक दुकाने आहेत. मटण चांगले मिळत असल्याने बेळगाव, संकेश्वर येथूनही नागरिक मटण व चिकन घेऊन जात असतात. यामुळे साहजिकच दुचाकी, चारचाकी वाहने दुकानासमोर पार्क करत असतात. यमनापूरजवळील सदर सर्व्हिस रस्त्यावरून काकती, होनगा, कडोली, केदनूर, देवगिरी, बंबरगा तसेच इतर गावातील नागरिक ये-जा करत असतात. दुकानांसमोरच गाडय़ा पार्क करत असल्यामुळे या रस्त्यावरून होणाऱया अवजड वाहतुकीत व्यत्यय येत आहे. यामुळे तेथे नागरिकांची गर्दी वाढून सामाजिक अंतराचा फज्जा उडत आहे. तरी सदर ठिकाणी गर्दी न करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.