औंधमध्ये संचारबंदी लागू, बाहेरील भाविकांना दर्शनासाठी येण्यास मज्जाव
वार्ताहर / औंध :
कोरोना आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे औंध येथील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या यमाईदेवीचा रथोत्सव उद्या मंगळवारी साध्या पध्दतीने मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रशासनाने संचारबंदी आदेश लागू केला असून, बाहेरुन येणाऱ्या भाविकांना औंधमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
दरवर्षी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीयमाईदेवीचा पौषी उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कोरोना महामारीचे संकट अद्याप दूर झालेले नाही. दर्शनासाठी बाहेरून येणाऱ्या भाविकांमुळे कोरोना आणि ओमिक्रॉन आजाराच्या विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन आणि देवस्थान ट्रस्ट यांनी यात्राउत्सव काळातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. पारंपरिक पद्धतीने मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते देवीची पूजा करून रथात प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. रथाची मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. गावातील ग्रामस्थांना कोरोना नियमांचे पालन करून सुरक्षित अंतर ठेवून रथाचे दर्शन घेता येईल.
रथोत्सवासाठी बाहेरून भाविक येऊ नयेत आणि कायदा सुव्यवस्थेच्या द्रुष्टीने जादा पोलीस कुमक मागवण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत बधे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.